प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्याने विविध साहित्याला मागणी वाढली आहे. विशेषतः पूजेच्या साहित्यांबरोबर काकडी, भोपळा, लिंबू, केळीची पाने-झाडे आदींना मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक देखील वाढली आहे. परिणामी भाजीपाला बाजारात लगबग दिसून येत आहे.
गणेशोत्सवात काकडीची अधिक मागणी असते. त्यामुळे काकडी आणि भोपळय़ाची आवक वाढल्याचे दिसत आहे. काकडी 20 ते 40 रु. एक प्रमाणे तर भोपळा 80 ते 120 रुपयाला एक असा विकला जात आहे. याबरोबर दुधी भोपळय़ाची देखील मागणी वाढली आहे. त्यामुळे भाजीपाला बाजाराला बहर आल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे सार्वजनिक आणि घरगुती बाप्पांसमोर पूजेचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे पूजेच्या साहित्याची मागणी वाढली आहे. पान, नारळ, केळीची पाने, लिंबू, हार, फुले आदींना विशेष मागणी आहे.
शहरासह ग्रामीण भागात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातूनही खरेदीसाठी नागरिक येऊ लागले आहेत. एरवी कमी दिसणारी काकडी सगळीकडे पहायला मिळत आहेत. स्थानिक जय किसान व एपीएमसी बाजाराबरोबर इतर ठिकाणांहूनही काकडी दाखल होत आहेत. त्याबरोबर मागणीही वाढली आहे.









