उत्रे / वार्ताहार
कोतोली फाटा ते नांदारी या २८ कि.मी.मार्गासाठी ए.डी.बी योजनेतून पावणे तिनशे कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे. सद्या या रस्त्याचे काम जलद गतीने सुरू आहे. रस्त्यावर जागोजागी मोर्यांचे बांधकाम पाईप ड्रेन पद्धतीने सुरूआहे. यामुळे वाहतुकीची गैरसोय होणार आहे. या मोऱ्याचे बांधकाम स्लॅपड्रेन पद्धतीने करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
पन्हाळा तालुका बहुतांश डोंगराळ असून या ठिकाणी पावसाळ्यात पाऊस अतिशय मोठ्या प्रमाणात असतो. डोंगर उतारावरुन येणारे पावसाचे पाणी अधिक प्रमाणात असते.पाण्याच्या प्रवाहातून, झाडेझुडपे, पालापाचोळा व माती थेट ओढयांना येऊन मिळते. यावेळी वाहून आलेली झाडेझुडपे,गाळ,दगडगोटे थेट पाईपड्रेन मोरीमध्ये तटून पाणी पुढे सरकणे देखील अडचणीचे ठरते.मोरीजवळ पाण्याची तुंबी लागते. परिणामी हे पाणी थेट रस्त्यावरून वाहू लागते.यामुळे वेळोवेळी मोरी साफ करावी लागते अन्यथा वाहतुक खोळंबून रस्ता वाहतुकीस बंद करण्याची वेळ येते.त्यामुळे भविष्यात पावसाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेऊन संबंधित विभागाने मोर्यांच्या बांधकामाकडे तातडीने लक्ष घालून स्लॅपड्रेन पद्धतीने मोर्या बांधण्याची मागणी नागरीकांच्यातून होत आहे.
पावसाळ्यात अतिवृष्टीच्यावेळी अनेक ओढ्या नाल्यांचे पाणी एकत्र येऊन मोर्यांना थेट मिळते..यावेळी वाहून येणारा कचरा, झुडपे, कचरा पाईपला अडकतो. साफ करणे अशक्य होते.त्यामुळे स्लॅपड्रेन पद्धतीच्या मोर्या सोयीच्या ठरणार आहेत.