मडगाव : मंगळवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने जरा ही विश्रांती न घेता बुधवारी जोर कायम धरल्याने सासष्टीच्या सखल भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. खास करून खारेबांद-बाणावलीच्या भागात परिस्थिती गंभीर होती. बाणावलीचे आमदार व्हिन्झी व्हियेगस यांनी सासष्टीचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार तसेच सार्वजनिक बांधकाम खाते आणि जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी बाणावलीचे सरपंच तसेच पंच सदस्यही उपस्थित होते. बगल रस्त्यासाठी बाणावली परिसरात पुलाचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आला आहे. मातीचा भराव टाकल्याने पाणी साचून राहिल्याने पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. वेर्णा येथून सुरू होणाऱ्या साळ नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली होती. पाण्याचा निचरा होत नसल्याने सासष्टीच्या सखल भागात काल दिवसभर पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. त्यात पुलाच्या बांधकामासाठी मातीचा भराव टाकण्यात आल्याने समस्या अधिक गंभीर बनली होती.
पूल स्टिल्ट्सरवरच उभारावा
बाणावलीचे आमदार व्हिन्झी व्हियेगस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर बगल रस्त्यासाठी उभारण्यात येणारा पूल स्टिल्ट्सरवरच उभारावा अशी मागणी केली. जर हा पूल स्टिल्ट्सवर उभारला तर पाणी व्यवस्थित वाहून जाऊ शकते. अन्यथा परिस्थिती गंभीर होईल अशी शक्यता व्यक्त केली. यावेळी उपस्थित असलेले जलस्त्रोत खात्याचे अधिकारी तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांनी देखील हा पूल स्टिल्ट्सवर उभारण्याची गरज असल्याचे मत मांडले. गेल्या वर्षी ही या भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. याकडे त्यांनी लक्ष वेधले. हा पूल स्टिल्ट्सवर उभारण्यात यावा यासाठी तसा अहवाल सरकारला सादर करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
सरकारने वेळीच निर्णय घ्यावा
पावसाळ्यात बाणावली परिसरात पूरग्रस्त स्थिती निर्माण होत असल्याने बगल रस्त्यासाठीचा पूल स्टिल्ट्सवर उभारण्याचा निर्णय लवकर घ्यावा. लोकांना न्यायालयात जाण्यास भाग पाडू नये. उद्या न्यायालयाने पूल स्टिल्ट्सवर उभारण्याचा आदेश दिला तर तो सरकारला मान्य करावाच लागेल. त्यापूर्वीच सरकारने पूल स्टिल्ट्सवर उभारण्यास सुरवात करावी अशी मागणी आमदार व्हियेगस यांनी केली.









