शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : अगसगेसह परिसरातील गावांना सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्री-अपरात्री पिकांना पाणी द्यावे लागत आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अगसगे येथे 110 केव्ही विद्युत संपर्क केंद्र उभारण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन अखंड कर्नाटक रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तालुक्यातील उत्तर भागात येणाऱ्या अगसगे, मण्णीकेरी, अतिवाड, बेकिनकेरे, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, केदनूर, हंदिगनूर या गावातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत केला जात नसल्याने शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेली पिके वाळून जात आहेत. केवळ तीन तास वीजपुरवठा केला जात आहे, तोही रात्रीच्यावेळी. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
वीज उपकेंद्रांसाठी आवश्यक जागा देण्याचे आश्वासन
या भागातील गावांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी अगसगे येथे 110 केव्ही वीज संपर्क केंद्र उभारण्यात यावे, यासाठी आवश्यक जमीन पुरविण्यात येईल, असे शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कलगौडा पाटील, वैजू लुम्याचे, प्रकाश लोहार, शट्टू घेवडी, परशराम रेडेकर, केदारी घेवडी, मुकुंद डोणकरी, राजू लाड आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









