कोल्हापूर / विद्याधर पिंपळे :
पुढच्या आठवड्यात जोतिबाची चैत्री यात्रा असल्याने, नारळ, गुलाल व पुजा साहित्याची मागणी वाढणार आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने, शितपेये, आईसक्रिम, ताकाची मागणी वाढत आहे. दोन वर्षात सोने, चांदीच्या दराने उच्चांक केला आहे.
जोतिबासह विविध यात्रांसाठी नारळ, गुलाल, खोबरे, कापूर, उदबत्तीची मागणी वाढली आहे. या आठवड्यापासून नारळाचे ट्रक जोतिबा यात्रेसाठी रवाना झाले आहेत. नारळ व गुलालच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. खास यात्रेसाठी अंदाजे 10 ट्रक नारळ आणि 10 टन गुलाल लागणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते. यात्रेसाठी खास पुजेच्या नारळाची मागणी असते. एका ट्रकमध्ये आकारानुसार 28 ते 30 हजार नारळ असतात. यावर्षी नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आकारानुसार नारळाच्या दरात नगामागे 10 ते 15 रूपयांनी वाढ झाली आहे. तसेच 12 ते 15 रूपये असलेला पूजेसाठी लागणारा मध्यम आकाराचा नारळ आता 25 ते 30 रूपये झाला आहे. जेवणावळी, हॉटेलसाठी लागणाऱ्या बोळ या नारळाच्या दराने 50 रूपयाची पातळी पार केली आहे. अगदी 30 ते 35 रूपये असलेला बोळ नारळ आता 50 रूपयांच्या पुढे झाला आहे.
- यात्रेसाठी नैसर्गिक गुलाल
जोतिबा यात्रेत उधळण करण्यासाठी गुलाल, खोबऱ्याच्या तुकड्याचा मान आहे. खोबऱ्याच्या वाटीमुळे तसेच तुकड्यांच्या उधळणीमुळे भाविक जखमी होण्याचा प्रकार होत असे. खोबऱ्याच्या उधळणीवर तसेच अनैसर्गिक गुलाल उधळण्यासाठी निर्बंध असल्याचे सांगण्यात येत आहे. जोतिबा यात्रेसाठी रोज दोन टनापेक्षा जास्त अगरबत्ती आणि कापराची विक्री होत आहे.
नैसर्गिक गुलालच्या दरात पोत्यामागे वाढ झाली आहे. गुलालाचे 25 किलोचे पोते 1700 रूपये झाले आहे. यापूर्वी गुलालाचे पोते 1500 रूपयाला मिळत होते. यात्रेसाठी निर्भेळ गुलालाची विक्री व्हावी, अशा सूचाना करण्यात आल्dया आहेत. कारण केमिकल मिश्रीत गुलालाचा दर कमी आहे. फक्त यात्रेसाठी स्वस्तातील गुलाल विक्री करणारा मोठा वर्ग आहे. यात्रेसाठी रोज दोन टन अगरबती व कापराची विक्री होत असते.
- शितपेयांची मागणी वाढली
उन्हाचा तडाखा वाढत असल्याने, शितपेयांच्या मागणीत वाढ होत आहे. शहाळे, कोकम, ताक, लिंबू सरबत, उसाचा रस आदीची मागणी वाढत आहे. उन्हामुळे लिंबूचे दर वाढल्याने लिंबू सरबतही महागले आहे शहरात शहाळयांचे स्टॉल्स कोपऱ्या कोपऱ्यावर आहेत. कंपन्यांच्या पॅकेज्ड नारळ पाणी बाजारात आले असून, याचा दर लिटरला 170 रुपये असल्याने या पॅकेज्ड नारळ पाणीला ही लोकाकडून मागणी वाढत आहे.
- आंबा आवक कमी
30 रोजी गुढी पाडवा तर 31 रोजी ईद असल्याने मार्केट यार्डमध्ये आंबा सौदे निघाले नाहीत. हापूस आंब्यांचे बॉक्स व पेटीसह तोतापुरी आंबा मार्केट यार्डमध्ये दाखल झाला आहे. यामध्ये नाममात्र हापूस आंबा पेटी दाखल झाली आहे.
26 मार्च रोजी 20 पेटी हापूस, 4286 बॉक्स हापूस तर 40 क्रेट तोतापुरी आंब्याची आवक झाली आहे. सौद्यामध्ये सरासरी पेटी दर 2000, बॉक्स 900 तर तोतापुरी 40 रूपये किलो असा दर होता. तर 27 रोजी हापूस पेटीची आवकच झाली नाही. यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर 28 रोजी हापूस पेटी 2000 वरून 2800 रूपये झाली होती. आवक होऊन दरही स्थिर आहे. तर तोतापुरीचा 40 वरून 30 रूपये किलो झाला आहे.
एप्रिलच्या पहील्या दिवशीच म्हणजेच एक एप्रिलला हापूस आंबा 60 पेटी तर 4912 बॉक्सची आवक झाली आहे. पेटीचा दर 2500 तर बॉक्सचा दर 700 रूपये असा कमी झाला आहे.
- दोन वर्षांत सोने 32600 तर चांदी 29700 ने महागली
सराफ बाजारात सोने व चांदी दराने उच्चांक केला आहे. यामुळे गुढी पाडवा व्यतिरिक्त इतर दिवशी सराफ बाजारात शांतता जाणवत होती. 1 एप्रिल 2023 च्या तुलनेत 2025 च्या 1 एप्रिलला दोन वर्षांत सोने 10 ग्रॅममागे 32600 तर चांदी किलोला 29700 ने महाग झाली आहे.
वर्ष (एप्रिल) सोने (10 ग्रॅम) चांदी (1 किलो)
2-4-2023 61200 72800
1-4-2024 70900 77700
1-4-2025 93800 102500








