म्हापसा : कळंगुटमध्ये नव्याने मसाज पार्लर सुरू झाल्याच्या कारणाने कळंगुटच्या पंच सदस्या सुनिता मयेकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांची भेट घेऊन कळंगुटमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेला मसाज पार्लर त्वरित बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्याची त्वरित दखल घेत सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी पंचायत कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी पाठवून संबंधित मसाज पार्लर बंद करण्याचा आदेश दिला. अशा गैरकृत्यांना आपण कदापि सहकार्य करणार नाही, असे सांगत त्यांनी याचे खापर माजी उपसरपंचावर फोडले.
बदली झालेल्या सचिवांनी परवाना कसा दिला?
आपल्या वॉर्डात मसाज स्पा पार्लर सुरू झाल्याचे स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंतर संबंधित मालकाला ताकिद देऊन बंद करण्याची सूचना दिली, असे माजी सरपंच सुदेश मयेकर म्हणाले. यापूर्वीचे सचिव 20 जून रोजी बदली होऊन अन्यत्र गेले. मात्र 10 जुलै रोजी त्यांनी परवान्यावर सही कशी काय केली? असा सवाल मयेकर यांनी केला. या प्रकरणी सरपंचानी संबंधित सचिवांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही हे बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही आमच्या गावात बेकायदेशीर स्पा पार्लर कदापि होऊ देणार नाही, असे पंच सुनिता मयेकर स्पष्ट केले.
माजी उपसरपंचांच्या आशीर्वादाने पार्लरला परवानगी : जोसेफ सिक्वेरा
स्थानिकांनी बेकायदा स्पा पार्लरबाबत तक्रार केल्यानंतर आपण तो त्वरित बंद केला. सदर स्पा पार्लर लवकरच सील करणार असल्याचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सांगितले. आजी माजी पंच उपसरपंच आमची कळंगूट पंचायत बदनाम करू पाहत आहे. सुदेश मयेकर यांनी त्यावेळी त्याला परवानगी कशी दिली. सामान्य लोकांना बांधकामास परवानगी मिळत नाही, मग त्यांना कशी काय परवानगी दिली, असा सवाल सरपंचानी केला.