कालवा फुटल्यास शेतजमिनीला धोका
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गावाजवळील तलावाला लागून गेलेल्या कालव्यातून गावचे सर्व सांडपाणी तसेच पावसाचे पाणी जाते. पावसाळ्यात कचरा अडकून कालवा फुटण्याची शक्यता असते. तसे झाल्यास खालील शेतवडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ग्रा. पं. ने कालव्याची सफाई करून पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी सेवा संघटनेकडून करण्यात येत आहे. मार्कंडेय नदीपर्यंत गेलेल्या कालव्यातून गावचे व नवीन वसाहतीचे सर्व सांडपाणी जाण्याची सोय ग्रा. पं. ने केली आहे. यामुळे बारमाही या कालव्यातून सांडपाणी वाहते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यानेही सदर कालवा तुडुंब भरून वाहत असतो. ग्रा. पं. ने वरचेवर सदर काव्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.. मागील चार महिन्यापूर्वी कालव्याच्या तोंडावर लहान हौद व जाळी बसवून प्लास्टिक बाटल्या, पिशव्या अडकून केवळ पाणी वाहून जाण्याचीही व्यवस्था केली आहे. परंतु जाळीवर अडकलेले प्लास्टिक काढण्याकडेही दुर्लक्ष होत आहे, अशाही तक्रारी शेतकरीवर्गातून होत आहेत.
सांडपाणी वाहून जाणारा एकमेव कालवा
पूर्वी गावचे सांडपाणी व पावसाचे पाणी तलावामध्ये जात होते. तलाव भरल्यावर हे पाणी मार्कंडेय नदीला जाऊन मिळत होते. परंतु तलावाच्या सौंदर्यीकरणानंतर सांडपाण्याबरोबर पावसाचेही पाणी कालव्याद्वारे मार्कंडेय नदीला मिळण्याची सोय करण्यात आली. परंतु कालव्याची वरचेवर सफाई करण्याकडे ग्रा. पं. चे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा ग्रा. पं. ने वरचेवर कालव्याची सफाई करून पाण्याचा निचरा व्यवस्थित करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कालवा फुटल्यास शेकडो हेक्टर जमीन गाळाखाली
कालवा शेतजमिनीतूनच मार्कंडेय नदीपर्यंत गेला आहे. कालव्याची वरचेवर सफाई न झाल्यास कालवा फुटून शेतकऱ्यांची पिके गाळाखाली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा खबरदारी म्हणून ग्रा. पं. ने कालव्याची त्वरित सफाई करून पाणी कालव्यातूनच जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.









