बेळगाव : उन्हाळी सुट्यांना सुरुवात झाली असल्याने पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, तिरुपती, बेंगळूर, हैदराबाद या मार्गांवरील रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले आहे. रेल्वे मिळत नसल्याने अखेर मिळेल त्या दराने खासगी ट्रॅव्हल्स पकडून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्यांमध्ये विशेष रेल्वे तसेच गर्दीच्या रेल्वेला जादा डबे जोडण्याची मागणी होत आहे. कर्नाटकसह महाराष्ट्रातील शाळा-कॉलेजना सुट्या पडल्याने पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बेळगावमधील अनेकजण मुंबई, पुणे, बेंगळूर अशा शहरांचा प्रवास करीत असतात. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असल्यामुळे पहिली पसंती रेल्वेला दिली जाते. सध्या बेळगाव-बेंगळूर मार्गावरील राणी चन्नम्मा, बेळगाव-बेंगळूर सुपरफास्ट एक्स्प्रेस, विश्वमानव एक्स्प्रेस या एक्स्प्रेसचे बुकिंग वेटिंगवर आहे. याचबरोबर बेळगाव-मुंबई मार्गावरील हुबळी-दादर व चालुक्य एक्स्प्रेस या दोन्ही रेल्वे पुढील काही दिवस बुकिंग फुल्ल आहेत. तिरुपती एक्स्प्रेसलाही बुकिंग सुरू आहे. त्यामुळे सध्या बुकिंग केल्यास मे अखेरनंतर बुकिंग उपलब्ध होत आहे. बुकिंग मिळत नसल्याने खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याची वेळ आली आहे. बेळगाव-मुंबई रेल्वे प्रवासासाठी स्लीपर कोचला ज्या ठिकाणी 400 रुपये मोजावे लागतात, त्याच ठिकाणी ट्रॅव्हल्ससाठी 1400 ते 1800 रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे अधिकचा भार प्रवाशांना सहन करावा लागत आहे. बेंगळूरच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. त्यामुळे विशेष रेल्वे सुरू केल्यास गर्दी कमी होण्यास मदत होईल.
य् ाा मार्गांवर होतेय तुफान गर्दी
- बेळगाव-मुंबई
- बेळगाव-पुणे
- बेळगाव-बेंगळूर
- बेळगाव-तिरुपती
खासगी टॅव्हल्स चालकांकडून लूट
रेल्वे व परिवहन मंडळाच्या बस बुकिंग असल्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. विशेषत: साप्ताहिक सुट्यांच्या दिवशी तीनपट दराने तिकीट दर आकारला जात आहे. त्यामुळे जादा तिकीट दर आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांविरोधात कारवाईची मागणी प्रवाशांमधून होत आहे.









