बसअभावी प्रवासी-विद्यार्थीवर्गाचे हाल : खानापूर आगार प्रमुखांना निवेदन
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-खानापूर अशी सायंकाळी 5.30 वाजता खानापूर बसस्थानकातून जादा बससेवा सुरू करावी, अशी मागणी जांबोटी, आमटे, ओलमणी परिसरातील असंख्य प्रवासी व विद्यार्थी वर्गातून होत आहे. जांबोटी भागासाठी खानापूर आगारामार्फत जांबोटी, आमटे, चापोली, चिगुळे, पारवाड, तळावडे आदी गावांसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत जांबोटी-खानापूर मार्गावर बससेवा उपलब्ध आहेत. मात्र सकाळी व सायंकाळी धावणाऱ्या बससेवा प्रवासी व विद्यार्थी वर्गासाठी गैरसोयीच्या ठरल्या आहेत. एकाच वेळी तीन ते चार बससेवा या मार्गावर धावत असल्यामुळे कुचकामी ठरल्या आहेत. जांबोटी, ओलमणी, आमटे, कान्सुली परिसरातील शेकडो विद्यार्थी खानापूर, बेळगाव येथे महाविद्यालयीन व माध्यमिक शिक्षणासाठी जातात. तसेच या भागातील अनेक नागरिक बेळगाव, खानापूर या ठिकाणी बाजारहाट व इतर शासकीय कामांसाठी नियमितपणे ये-जा करतात.
सकाळच्या वेळी विद्यार्थी व प्रवासी वर्गांना बससेवा उपलब्ध असल्या तरी सायंकाळी 4.30 नंतर खानापूरहून जांबोटीकडे जाण्यासाठी एकही बस उपलब्ध नसल्यामुळे बसअभावी विद्यार्थी व प्रवासीवर्गांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वास्तविक पाहता शाळा महाविद्यालये सायंकाळी पाच वाजल्यानंतर सुटतात. मात्र खानापूरहून जांबोटीकडे जाण्यासाठी 4.30 ची एकमेव बस उपलब्ध असल्यामुळे बेळगाव, खानापूर येथे उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बस गाठण्यासाठी एक-दोन तास सोडूनच परतावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच 4.30 नंतर बस नसल्यामुळे परगावाहून येणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय होतआहे. आमटे, चापोली, चिगुळे या तीन बसेस साडेचारच्या अगोदरच सुटतात. मात्र या बस विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कुचकामी ठरल्यामुळे या बसच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा किंवा खानापूरवरून सायंकाळी 5.30 वाजता जांबोटीसाठी जादा बससेवेची सोय करावी, अशी मागणी प्रवासी विद्यार्थी व पालकवर्गातून होत आहे. यासंदर्भात आमटे ग्रा. पं.तर्फे खानापूर आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे. आमदार विठ्ठल हलगेकर व आगार प्रमुखांनी लक्ष घालून सायंकाळी जादा बससेवा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशी वर्गातून होत आहे.









