जिल्हाधिकारी, जि. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी, पोलीस निरीक्षकांना निवेदन
खानापूर : कौलापूरवाडा येथे क्वॉलिटी अनिमल फिडस प्रा. लि. यांच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या पोल्ट्री फार्म तसेच नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या हॅचरी प्रकल्पाला जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी विनाहरकत पत्र देताना चुकीची माहिती देवून शासनाची दिशाभूल करून विनाहरकत पत्र दिले आहे. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कौलापूरवाडा ग्रामस्थ, लोकेश्वर देवस्थान कमिटी कौलापूर यांच्यावतीने नुकताच जिल्हाधिकारी, जि. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यासह संबंधित विभागाच्या प्रमुखांना देण्यात आले आहे.
कौलापूरवाडा येथे क्वॉलिटी अनिमल फिडसच्या नव्याने सुरु होणाऱ्या हॅचरी प्रकल्पाला आवश्यक असणारे नाहरकत पत्र देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे पत्र आवश्यक असते. यासाठी सरकारने घालून दिलेल्या मार्गसुचीनुसार विना हरकत पत्र देणे आवश्यक असते. मात्र जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कौलापूरवाडा गाव हे प्रकल्पापासून 2 कि. मी. असल्याचे नाहरकत पत्रात नमूद केले आहे. हे साफ चुकीचे आहे. कौलापूरवाडा गाव हे क्वॉलिटी अनिमल फिड्सच्या प्रकल्पाला लागूनच आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
याबाबत गेल्या अनेक वर्षापासून आंदोलने, तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. असे असताना क्वॉलिटी अनिमल फिड्सने नव्याने या ठिकाणी हॅचरी प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी शासनाकडून आवश्यक असलेली परवाने घेण्यासाठी धडपड सुरू आहे. शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन चुकीची माहिती सरकारदरबारी पुरविण्यात येत आहे. यासाठी चुकीची माहिती देणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.









