बेळगाव : जिल्ह्यातील काही खासगी बँकांनी त्यांच्या प्रतिनिधीमार्फत गोकाक तालुक्यातील नेलगंटी, मुडलगी आणि बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावातील ग्रामस्थांची कर्ज देऊन फसवणूक केली आहे. कर्ज देताना केवळ 35 टक्के रक्कम देण्यात आली असून संपूर्ण कर्जासाठी तगादा लावण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत ग्रामस्थांना न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरु सेना यांच्यावतीने गुरुवार दि. 2 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
काही बँकांचे प्रतिनिधी कर्ज मंजूर करून कर्जदारांच्या खात्यात पैसे जमा करतात. मात्र त्यापैकी काही रक्कम ते स्वत: घेऊन केवळ 35 टक्के रक्कम कर्जदाराला देत आहेत. अशारितीने गोकाक आणि बेळगाव तालुक्यातील फसवणूक झाली असून आता कर्जाच्या सर्व रकमेच्या वसुलीसाठी लोकांना त्रास दिला जात आहे. कर्जदारांच्या घरावर नोटिसा चिकटवून घरे जप्त करणार असल्याचे सांगितले जात आहे. बहुतांश कर्जदार हे कुली कामगार व शेतकरी असून या सर्व प्रकारामुळे त्यांना मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल घेत तपास करून ग्रामस्थांवर होणारा त्रास दूर करावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.









