खोट्या बातम्या पसरवल्याच्या आरोपावरून टार्गेट
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तिच्या मॅनेजरने अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून तिच्या मृत्यूची बातमी दिली होती. त्यानंतर आता अभिनेत्रीने खुलासा करताना आपले निधन झाले नसल्याचे सांगत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पूनमने आपण जिवंत असल्याची माहिती दिली आहे. मात्र, आपल्याच मृत्यूची खोटी माहिती जारी करून खळबळ माजवल्याबद्दल तिच्यावर कारवाईची मागणी होत आहे. तसेच खोट्या बातम्या पसरवल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्नही विविध संघटनांकडून सुरू आहेत. पूनम पांडे जिवंत असून ती पूर्णपणे बरी आहे. तिने शनिवारी सकाळी एक व्हिडिओ जारी करत आपल्या ‘मृत्यू’मागील सत्य उलगडण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारपासून सर्वत्र पूनम पांडेच्या निधनाची चर्चा होती. आता पूनमने पुढे येऊन आपण मृत नसल्याचे स्पष्ट करताना आपल्या मृत्यूची बातमी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी पसरवल्याचा युक्तिवाद केला. पूनम पांडेचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सही अभिनेत्रीला टार्गेट करत आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करताना अनेकांनी तिची खिल्ली उडवली. त्याचबरोबर अनेकांनी अभिनेत्रीच्या मागील पोस्ट आणि तिच्या मृत्यूची अफवा चुकीची असल्याचे म्हटले आहे. पूनम पांडेने 2 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मृत्यूची खोटी अफवा पसरवली होती.









