पुणे / वार्ताहर :
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून जीवितास धोका असल्याची पोलिसात तक्रार दाखल करणाऱ्या रवींद्र साळगावकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना भेटून लेखी निवेदन सादर केले आहे.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात प्रवक्ते प्रदीप देशमुख, उदय महाले, संदीप बालवडकर, दिपक कामठे, शशिकांत जगताप उपस्थित होते.
जगताप म्हणाले, भाजपचा शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळगावकर याने काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विषयी एक तक्रार दिलेली आहे. हा राजकीय कार्यकर्त्याच्या वेशातील एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असून, काही वर्षांपूर्वी या व्यक्तीला खुनाच्या आरोपांमध्ये अटक केलेली होती. तसेच तो काही वर्ष जेलमध्ये जावून आलेला आहे. त्याचा कब्जा असलेल्या ज्या जमिनीचा या व्यक्तीने उल्लेख केलेला आहे, ती जमीन गोयल नामक व्यक्तीची आहे व त्यात अजितदादांचा दूरवर कोणताही संबंध नाही. गुन्हेगारी क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवण्याकरिता व एका लोकप्रिय नेत्यावर आपण काही आरोप केले तर त्यातून प्रसिध्दी मिळून आपल्या वरिष्ठांना खूश करण्याकरिता त्याने अजितदादांवर आरोप केले आहेत.
ही व्यक्ती वेगवेगळय़ा गुन्हेगारी कृत्यात सहभागी असून, दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेल्या भूषण शंकर शिंदे व त्यांच्या वडिलांच्या मुत्यूस कारणीभूत असल्याचा दाट संशय आहे. या प्रकरणाचा अत्यंत काटेकोरपणे तपास होऊन दोषीवर कडक कारवाई होण्याकरीता आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे.








