अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांचा संसदेसमोर प्रस्ताव : युद्धात सामील अमेरिकेचा माजी सैनिक ठार
रशिया-युक्रेन युद्धाला आता 65 दिवस झाले असून रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील पायाभूत सुविधा कोलमडून गेल्या आहेत. अशा स्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनला मदत करण्यासाठी काँग्रेससमोर 33 अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव मांडला आहे. या रकमेपैकी 20 अब्ज डॉलर्स सैन्य सहाय्यासाठी तर 8.5 अब्ज डॉलर्स युक्रेनच्या सरकारकरता आणि उर्वरित 3 अब्ज डॉलर्स लोकांना मदत करण्यासाठी दिले जाऊ शकतात.
दुसरीकडे संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनियो गुतेरेस शुक्रवारी युक्रेनची राजधानी कीव्ह येथे पोहोचले. येथे त्यांनी शहराच्या विविध भागांचा दौरा करत युद्धगुन्हय़ांसाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. संयुक्त राष्ट्रसंघ महासचिवांच्या कीव्ह दौऱयादरम्यानच शहरावर रशियाचे हल्ले सुरू झाले. शुक्रवारी रशियन सैन्याने शहरावर 3 क्षेपणास्त्रs डागली असल्याची माहिती सैन्य प्रशासनाने दिली आहे.
युक्रेनच्या सैन्यासोबत रशियाच्या विरोधात लढत असलेल्या अमेरिकेच्या एका माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धात कुठल्याही अमेरिकन नागरिकाच्या मृत्यूचे हे पहिलेच प्रकरण आहे. मारले गेलेल्या सैनिकाचे नाव विली जोसेफ होते. 22 वर्षीय जोसेफची आई रेबेका यांनी मुलाच्या मृत्यूची पुष्टी दिली आहे. माझा मुलगा एका मिलिट्री कॉन्ट्रक्ट कंपनीसाठी काम करत होता. कंपनीने त्याला युक्रेनमध्ये पाठविले होते. तो स्वतः देखील तेथे जाऊ इच्छित होता. युक्रेनच्या लोकांसोबत अन्याय झाला असल्याचे त्याला वाटत होते. आम्हाला आतापर्यंत त्याचा मृतदेह मिळू शकलेला नाही असे रेबेका यांनी सांगितले आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने याप्रकरणी तपास केला जात असल्याचे म्हटले आहे.
नेदरलँडचा महत्त्वाचा निर्णय
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये पुन्हा दूतावास सुरू करण्याचा निर्णय नेदरलँडने घेतला आहे. सुमारे 2 महिन्यांपूर्वी रशियाकडून हल्ले सुरू झाल्यावर 20 फेब्रुवारी रोजी हा दूतावास बंद करण्यात आला होता. 16 एप्रिलपासून हा दूतावास युक्रेनच्या लीव्ह शहरातून संचालित होत होता. नेदरलँडच्या विदेश मंत्रालयानुसार दूतावासात मर्यादित संख्येतच लोक काम करतील. युक्रेनसोबत आमचे चांगले संबंध असू आम्ही त्यांचे समर्थन करतो. नेदरलँड युक्रेनला सैन्य सहाय्य करणे सुरूच ठेवणार असल्याचे नेदरलँडच्या विदेशमंत्री वोपके होकेस्ट्रा यांनी म्हटले आहे.
युक्रेनच्या हवाई सुरक्षा यंत्रणेची कमाल
युक्रेनच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने दिवसभरात रशियाच्या 3 क्षेपणास्त्र हल्ल्यांना उधळून लावले असल्याची माहिती ओडेसाचे गव्हर्नर मॅक्सिम मार्चेंको यांनी दिली आहे. युक्रेन युद्धाची झळ आता युक्रेनच्या शेजारी देशांपर्यंत देखील पोहोचू लागली आहे. बुल्गारिया आणि इस्रायलने स्वतःच्या नागरिकांना मोल्दोवा आणि ट्रांसनिस्ट्रिया सोडण्याची सूचना केली आहे. यापूर्वी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आणि कॅनडाने देखील स्वतःच्या नागरिकांना मोल्दोवामधून बाहेर पडण्यास सांगितले होते.









