गोकाक येथील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार भालचंद्र जारकीहोळी (सावकार) यांना पाठिंबा दिला नाही. त्यामुळे निवडणुकीत त्यांना कमी मतदान झाले, असे सांगत आमदारांच्या समर्थकांकडून हल्ला करण्यात आला आहे. उलट घटनेमध्ये जखमी झालेल्यांवरच गोकाक ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झालेला अन्याय दूर करण्यात यावा, खोटी तक्रार दाखल करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन गोकाक तालुक्यातील नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. गोकाक तालुक्यातील मेळवंक्की येथील शंकरगौडा हडगीनाळ हे गोकाक येथे मुलांना घेऊन आधारकार्ड अपडेट करण्यासाठी दि. 30 रोजी गेले होते.
सदर काम संपवून ते दुपारी 2.30 च्या सुमारास परत येत असताना मेळवंक्की क्रॉस येथील अडीबट्टी जॅकवेल येथे महादेव कंकाळी व अडव्याप्पा कंकाळी या दोघांनी कोणतेच कारण नसताना शंकरगौडा हडगीनाळ यांच्यावर हल्ला केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत भालचंद्र सावकारांच्या पॅनेलला पाठिंबा न देता विरोध केला आहे, असे सांगत शंकरगौडा यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत शंकरगौडा जखमी झाला असताना पोलिसांकडून उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक व सहकाऱ्यांकडून जखमी व्यक्तीला न्याय देण्याऐवजी राजकीय दबावाला बळी पडून सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय केला जात आहे. आमदारांच्या हस्तकांकडून असा अन्याय करण्यात येत असून त्यांच्यावर कारवाई करावी, आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी शंकरगौडाचे वडील बसाप्पा हडगीनाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी संगप्पा कळ्ळीगुद्दी, प्रकाश भागोजी, अॅड. बसवराज कापसे, सुरेश बनजगी, बाळाप्पा पाटील, शशिकांत कल्लोळी आदी नागरिक उपस्थित होते.









