पहिल्याच दिवशी महोत्सवाला लागले गालबोट : झाला प्रकार झाकण्याचा आयोजकांकडून प्रयत्न
पेडणे / प्रतिनिधी
धारगळ येथे बहुचर्चित सनबर्न महोत्सवात पहिल्याच दिवशी शनिवारी दिल्ली येथील युवकाचा सनबर्न फेस्टिवलमध्ये सहभागी झाल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ज्या भीतीमुळे सनबर्न इलेक्ट्रॉनिक म्युझिक डान्स फेस्टिव्हलला विरोध केला जात होता नेमकी तीच भीती खरी ठरली आहे. सनबर्न इडीएम फेस्टिव्हला उपस्थित राहिलेल्या दिल्लीतील करण राजू कश्यप या युवकाचा मृत्यू झाला आहे.
या युवकाचा नेमका मृत्यू कशाने झाला ते अजून कारण स्पष्ट झाले नाही. सेवा चिकित्सा अहवाल आल्यानंतर ही माहिती कळणार आहे. त्याच्या मृत्यूबाबत ड्रग्स ओव्हरडोसचाही संशय व्यक्त केला जात आहे.
करण कश्यप हा युवक दिल्ली येथील असून शनिवारी तो ईडीएम फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. म्युझिकच्या तालावर तो खूप नाचलाही होता. परंतु नंतर तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला नंतर म्हापशातील खाजगी इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचा मृतदेह चिकित्सा करण्यासाठी गोमेकॉत पाठवला आहे.
दरम्यान धारगळ येथे पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या सनबर्न महोत्सवाला एका युवकाचा मृत्यू झाल्याने गालबोट लागले आहे.
रविवारी सनबर्न महोत्सवाला गोव्याच्या विविध भागातून तसेच देशातील विविध राज्यातून अनेक युवा युवतींनी आपला सहभाग दर्शवला. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्यांची वर्दळ सुरू होती. परिसरात पार्किंग व्यवस्थाही कमी पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला लावण्यात आल्या होत्या. काही प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. सर्विस रस्त्याने ही वाहतूक सनबर्न ठिकाणी वळविण्यात येत असल्याने राष्ट्रीय महामार्ग मोकळा होता.









