शपथविधीचा दिवस निश्चित : 19 तारखेला विधिमंडळ पक्षाची बैठक : 20 रोजी दिल्लीत एनडीएशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असतील? यावर देशाच्या नजरा खिळल्या आहेत. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून दहा दिवस उलटले तरी अद्याप नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, आता विधिमंडळ पक्षाची बैठक 19 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 फेब्रुवारी रोजी दिल्ली मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ होणार आहे. 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी एनडीएशासित राज्यांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याचदिवशी, दिल्लीत एनडीएशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठकही होणार आहे.
20 फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर नवीन मुख्यमंत्री शपथ घेतील. मात्र, भाजपने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित केलेला नाही. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक 19 फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आली असून त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाईल. सुरुवातीला 17 फेब्रुवारी रोजी म्हणजेच सोमवारी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आणि 18 फेब्रुवारी रोजी शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. तथापि, ऐनवेळी विधिमंडळ पक्षाची बैठक दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे पक्षाच्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळा दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री, भाजप आणि एनडीए शासित 20 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा समावेश असेल. याशिवाय उद्योगपती, चित्रपट तारे, क्रीडापटू, संत-महंत आणि राजनयिक अधिकारीदेखील उपस्थित राहतील. या सोहळ्यासाठी दिल्लीतून 12 ते 16 हजार लोकांना बोलावण्याची तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या व्यवस्थेवर देखरेख करण्यासाठी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि तरुण चुघ यांना प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी तावडे व चुघ या दोघांनीही दिल्ली भाजप नेत्यांसोबत व्यवस्थेबाबत बैठक घेतली. या बैठकीला दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि दिल्ली भाजप संघटनेचे अधिकारी देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 6 नावे
भाजप आपल्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीतून लोकांना आश्चर्यचकित करत आहे. पक्षाने सर्व राजकीय अटकळ बाजूला ठेवून संघटनेतील जुन्या चेहऱ्यांना राज्याची सूत्रे सोपवली आहेत. असे असूनही, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 6 आमदारांची नावे आघाडीवर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने 15 आमदारांची नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी 9 नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. या 9 नावांमधून मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि सभापतींची नावे निश्चित केली जातील. दिल्ली मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 7 मंत्री असू शकतात. अशा परिस्थितीत दिल्लीतील सातही लोकसभा जागांमधून प्रत्येकी एक भाजप आमदार मंत्रिमंडळात स्थान मिळवू शकतो अशी चर्चा आहे. जातीय समीकरणे लक्षात घेऊन त्यांची निवड केली जाईल.
आतिशी यांचा भाजपवर निशाणा
भाजप पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसतानाही निवडणूक लढवली होती. निवडणुकीत त्यांचा विजय झाल्यानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्लीच्या काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी यांनी अद्याप सरकार स्थापन न झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.









