अरविंद केजरीवाल यांची पद सोडण्याची घोषणा : पक्षाचे आमदार नवा नेता निवडणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तुऊंगातून जामिनावर बाहेर आलेले अरविंद केजरीवाल येत्या दोन दिवसात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. आम आदमी पार्टीच्या कार्यालयात केजरीवाल यांनीच रविवारी स्वत: यासंबंधीची घोषणा केली. तसेच येत्या दोन-तीन दिवसांत आमदारांच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपने माझ्यावर अप्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले, आता जनतेच्या न्यायालयात माझ्या प्रामाणिकपणाचा निर्णय होईल. निवडणुकीपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. मनीष सिसोदिया यांच्यावरही माझ्यासारखेच आरोप असल्यामुळे तेसुद्धा पद भूषवणार नाहीत. आता आम्ही निवडणूक जिंकल्यावरच पद भूषवणार, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या दोन दिवसात विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. यासोबतच मनीष सिसोदिया मुख्यमंत्री होण्याची शक्मयताही त्यांनी फेटाळून लावली.
अरविंद केजरीवाल दिल्ली मद्य धोरण प्रकरणात 177 दिवसांनंतर जामिनावर तुऊंगातून बाहेर आले. ते मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाहीत आणि कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी करणार नाहीत, अशी अट सर्वोच्च न्यायालयाने ठेवली आहे. म्हणजे तुरंगातून बाहेर येऊन मुख्यमंत्री असूनही त्यांच्याकडे सत्ता राहिलेली नाही. मंत्रिमंडळाच्या भरवशावर सरकार चालणार होते. मात्र, आता केजरीवाल यांनी पदत्याग करण्याची घोषणा करत नवा मुख्यमंत्री नेमण्याची तयारी चालवल्यामुळे सरकारी निर्णयांना चालना मिळू शकते.
पाच महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक
दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2025 मध्ये संपत आहे. म्हणजे सरकारकडे निवडणुकीसाठी अवघे 5 महिने उरले आहेत. केजरीवाल न्यायालयाच्या अटींना बांधील आहेत. तुरंगातून सुटल्यानंतर केजरीवाल यांच्याबद्दल सहानुभूती आहे. या सहानुभूतीचे भांडवल केजरीवाल यांना दोन-तीन महिने आधीच दिल्लीत निवडणुकांची मागणी करून करायचे आहे.
केजरीवालजी कट्टर प्रामाणिक : आप
केजरीवाल यांच्या या घोषणेवर अनेक आप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. आपचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, ज्या देशात कोणीही नगरसेवकपदाचा राजीनामा देत नाही, त्या देशात आमचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या अग्निपरीक्षेला सामोरे जाऊनच मुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवालजी कट्टर प्रामाणिक आहेत हे आता जनता मान्य करेल. अशा पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आहे, असे चढ्ढा यांनी सांगितले.
प्रामाणिकपणा जनता ठरवेल : कैलाश गेहलोत
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी आम्ही सहमत आहोत. केजरीवालजी यांनी लोकांचे प्रेम, आदर आणि आशीर्वाद मिळवले आहेत. आपण प्रामाणिक आहोत की नाही आणि पक्ष प्रामाणिक आहे की नाही हे त्यांनी दिल्लीतील जनतेवर सोडले आहे, असे दिल्लीचे पर्यटन मंत्री कैलाश गेहलोत म्हणाले. तसेच केजरीवाल यांच्या या घोषणेवर दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही ‘एखाद्या मुख्यमंत्र्यांनी न्यायालयातून जामीन मिळवल्यानंतर स्वत: पद सोडण्याची तयारी दर्शविल्याचे उदाहरण जगात तुम्हाला सापडणार नाही’ असे सांगितले.
केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर पुढे काय?
मुख्यमंत्री कोण होणार : केजरीवाल प्रामाणिक की बेईमान हे जनतेने ठरवायचे आहे, असे केजरीवाल म्हणाले. निवडणुकीनंतर जनतेने मला निवडून दिल्यास मी पदावर बसेन. निवडणुका होईपर्यंत पक्ष दोन-तीन दिवसात नवा मुख्यमंत्री निवडेल. आतिशी, कैलाश गेहलोत, गोपाल राय, सौरभ भारद्वाज आणि सुनीता केजरीवाल यांच्यापैकी कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो.
राजीनाम्यानंतर केजरीवाल काय करणार : हरियाणात 5 ऑक्टोबरला मतदान आहे. ‘आप’ने राज्यात काँग्रेससोबत युती केलेली नाही. साहजिकच पक्षाने सर्व 90 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. केजरीवाल यांचे संपूर्ण लक्ष आता हरियाणातील निवडणूक प्रचारावर असेल. जम्मू-काश्मीरमध्येही ‘आप’ विधानसभा निवडणूक लढवत आहे. या प्रचारात केजरीवाल सक्रीयपणे लक्ष घालण्याची शक्यता आहे.
केजरीवालांच्या घोषणेवर इतर पक्षांचे भाष्य…
वीरेंद्र सचदेवा, भाजप : अरविंद केजरीवाल दिल्लीतील लोकांमध्ये जाणार असल्याचे सांगत आहेत. पण दिल्लीतील लोकांनी 3 महिन्यांपूर्वीच मतदान केले आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने निकाल देऊन ‘आप’ला शून्य जागा दिल्या.
संदीप दीक्षित, काँग्रेस : केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी राजीनामा द्यावा, असे आम्ही अनेक दिवसांपासून म्हणत आहोत. ही एक नौटंकी आहे. सर्वोच्च न्यायालय केजरीवाल यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवत आहे. नैतिकता आणि अरविंद केजरीवाल यांचा काही संबंध नाही.