वृत्तसंस्था/नवी दिल्ली
एअर इंडिया 1 सप्टेंबर 2025 पासून दिल्ली आणि वॉशिंग्टन डीसी दरम्यानची सेवा बंद करणार आहे. काही खास कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनी आपल्या विमानांमध्ये सुधारणा करण्याचे काम करत असल्यामुळे एअर इंडियाच्या विमानांची संख्या कमी होणार आहे. तसेच पाकिस्तानवरील हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे उड्डाणांवरही परिणाम होत आहे. या सर्व कारणांमुळे एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे. या फेरीसाठी तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना इतर उड्डाणांमध्ये जागा दिली जाईल किंवा त्यांना पूर्ण पैसे परत मिळतील.
भारताचे अमेरिकेशी संबंध बिघडले असताना एअर इंडियाने सोमवारी ही घोषणा केल्यानंतर सुरुवातीला वेगवेगळे तर्क-वितर्क व्यक्त करण्यात आले. मात्र, कंपनीने याबाबत विमानांमध्ये अद्ययावतीकरणाचे कारण सांगितल्यानंतर सर्वसामान्यांचे शंकानिरसन झाले. एअर इंडियाने गेल्या महिन्यात त्यांच्या 26 बोईंग 787-8 विमानांमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू केले. विमानांना नवीन रूप देण्यासाठी बराच वेळ लागेल. 2026 च्या अखेरीपर्यंत अनेक विमाने उपलब्ध राहणार नाहीत. याशिवाय, पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. याचा परिणाम एअर इंडियाच्या लांब पल्ल्याच्या उड्डाणांवर होत आहे.









