काही मंत्री आपले मंत्रीपद राखण्याच्या प्रयत्नात : अनेक आमदारांचे मंत्रिपद मिळविण्यासाठी लॉबिंग
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारच्या मंत्रिमंडळाची फेररचना होण्याची शक्यता असल्याने काही मंत्री व सत्ताधारी आमदारांनी आपल्याला राजकीय फायदा व्हावा तसेच काहींनी आपली खुर्ची शाबूत रहावी, यासाठी दिल्लीतील नेत्यांकडे आतापासूनच लॉबिंग सुरू करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. शुक्रवारी 6 डिसेंबर रोजी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा राज्यसभा खासदार अऊण सिंह यांनी गोव्याला भेट देऊन येथील राजकीय परीस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी काही आमदारांनी त्यांच्याकडे खासगीत आपल्याला यापुढे मंत्रिपद मिळावे, यासाठी त्यांच्याकरवी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. सदस्यता नोंदणीसाठी आलेले अऊण सिंह यांना काही स्थानिक नेत्यांनी येथील राजकीय परिस्थितीची माहिती दिली आहे.
खंवटे भेटले अमित शहांना
पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खंवटे हेही हल्लीच दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आले आहेत. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनीही भाजपच्या इतर नेत्यांची भेट घेतल्याने गोव्यातील राजकीय वातावरण बदलण्याची चिन्हे आहेत. कारण राज्यातील काही नेते पुन्हा एकदा दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
आमदार, मंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या
यापूर्वी भाजपच्या कोअर बैठकीत स्थानिक नेतृत्वाला कल्पना दिल्याशिवाय दिल्लीतील नेत्यांची भेट घेणे पक्षाच्यादृष्टीने योग्य नाही, असे खासदार सदानंद शेट तानावडे व मुख्यमंत्री सावंत यांनी जाहीररित्या सुनावले होते. परंतु आता पुन्हा आमदार व मंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याने नेमके हे भेट घेणारे नेते आपल्या पदरात काय पाडून घेतात, त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सिवेमवरा – संतोष यांची भेट
पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हे दिल्लीत गेले असून, ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांना भेटलेले आहेत. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे मात्र ते दिल्लीहून परतल्यानंतरच समोर येणार आहे. सरकारातील घटकपक्ष असलेल्या ‘मगो’चे आमदार जीत आरोलकर यांना जरी तूर्तास मंत्रीपद नको असले तरी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास त्यांनाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
कामत, आमोणकरही प्रयत्नरत
महाराष्ट्रासह इतर राज्यातीलही विधानसभा निवडणुका संपुष्टात आल्यामुळे हीच संधी साधून गोव्यातील भाजपच्या मंत्री-आमदारांनी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेणे सुरू केले आहे. मडगावचे अनुभवी आमदार दिगंबर कामत तसेच मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनाही मंत्रीपदाची अपेक्षा असल्याने त्यांचीही मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. सभापतीपदावर खूश असलेले राज्याचे अनुभवी नेते रमेश तवडकर यांनी भाजप पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारण्याची आपली तयारी असल्याचे यापूर्वीच सांगितले असल्याने त्यांच्याही नावाचा मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान विचार होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वतुळात जोर धरु लागली आहे. त्यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









