वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाने मीरान हैदर नावाचा जामियाचा विद्यार्थी आणि राजद युवा शाखेच्या नेत्याला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हैदरचे नाव 2020 मधील दिल्ली दंगलीशी जोडले गेलेले आहे. त्याच्या विरोधात हिंसा भडकविल्याचा आरोप आहे. हैदरने बहिणीच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे कारण देत न्यायालयाकडून जामिनाची मागणी केली होती. दिल्ली येथे झालेल्या दंगलीत 53 जणांचा मृत्यू झाला होता तर सुमारे 700 जण जखमी झाले होते. सीएएविरोधी निदर्शनांमुळे दिल्लीत दंगल झाली होती.
मुलाच्या मृत्युमुळे हैदरची बहिण एकाकी पडली आहे. तिचा पती युएईत कामाला असल्याने कुटुंबात अन्य कुठलाच पुरुष सदस्य नाही. हैदर हा एप्रिल 2020 पासून तुरुंगात कैद असून त्याने यापूर्वी अंतरिम जामीन मागितला नव्हता असा युक्तिवाद त्याच्या वकिलाकडून करण्यात आला. हा युक्तिवाद मान्य करत उच्च न्यायालयाने हैदरला 10 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
जामिनाच्या कालावधीत हैदरला काही अटी मान्य कराव्या लागणार आहेत. जामिनाच्या कालावधीत त्याला कुठल्याही साक्षीदाराशी संपर्क करता येणार नाही. तसेच कुठल्याही प्रकारचे पुरावे नष्ट करता येणार नाहीत. तपास अधिकाऱ्यांना स्वत:चा संपर्क क्रमांक उपलब्ध करत फोन सदैव ऑन ठेवावा लागणार आहे. हैदरला दंगलीशी निगडित कुठलीही मुलाखत देता येणार नाही. यात सोशल मीडियावरील टिप्पणीचाही समावेश असेल.
मीरान हैदर हा जामिया समन्वय समितीचा समन्वयक होता. त्याने 2020 च्या दंगलींमध्ये मोठी भूमिका बजावली होती. हैदरसोबत उमर खालिद, शरजील इमाम आणि अन्य काही जणांवर दंगलीचा सूत्रधार असण्याचा आरोप आहे.









