सलग दोन दिवस प्रवासी ताटकळत : संताप अनावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजधानी दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात पायलट न आल्याने प्रवाशांना बराच वेळ ताटकळत प्रतिक्षा करावी लागली. दिल्ली ते पुणे एअर इंडियाच्या विमानात असलेल्या 100 हून अधिक प्रवाशांना पायलटच्या अनुपस्थितीमुळे जवळपास दोन तास विमानातच थांबावे लागले. प्रशासनाने विमानाच्या विलंबासाठी तांत्रिक समस्यांचे कारण पुढे केले असले तरी पायलटअभावी सलग दोन दिवस दिल्ली-पुणे विमानफेरीला विलंब झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
फ्लाइट क्रमांक एआय853 सोमवारी रात्री 7.10 वाजता दिल्लीहून निघणार होते. पुण्यात पोहोचण्याची वेळ रात्री 9:10 वाजता होती. तथापि, सदर विमानाने दिल्लीहून रात्री 9 वाजता उ•ाण करत रात्री 11 वाजता प्रवाशांना पुण्यात उतरवले. याच दिल्ली-पुणे विमानाला मंगळवारी पुन्हा एकदा विलंब झाला. यावेळीही प्रवाशांनी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत ताटकळत थांबावे लागले. मंगळवार, 26 सप्टेंबरला चार तासांचा विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानतळ टर्मिनल बिल्डिंगमध्ये प्रवाशांनी याबाबत चौकशी सुरू केली असता, विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विलंबाचे कारण ऑपरेशनल समस्या असल्याचे सांगितले. विमानसेवेतील या दिरंगाईबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. काही प्रवाशांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना दोन तास विमानात पायलटची वाट पाहत बसावे लागल्याची स्पष्ट टिप्पणी केली आहे.









