राऊस अव्हेन्यू कोर्टाने दिला होता आदेश; सरकारी पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी पैशाच्या गैरवापराच्या प्रकरणात सार्वजनिक मालमत्ता कायद्यांतर्गत हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. केजरीवाल यांच्यावर प्रसिद्धीसाठी मोठे होर्डिंग्ज लावण्यासाठी सार्वजनिक पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 एप्रिल रोजी निश्चित केली आहे. केजरीवाल आणि इतर दोन नेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर राऊस अव्हेन्यू कोर्टात शुक्रवारी सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली. यापूर्वी 11 मार्च रोजी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सरकारी पैशाच्या गैरवापराच्या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने 18 मार्चपर्यंत पोलिसांकडून या प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट मागितला होता.
सहा वर्षांपूर्वी न्यायालयात याचिका
2019 मध्ये दिल्लीच्या एका न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे माजी आमदार गुलाब सिंग आणि द्वारकाच्या नगरसेविका नीतिका शर्मा यांनी परिसरात मोठमोठे होर्डिंग्ज लावून सार्वजनिक पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने याचिका फेटाळून लावत एफआयआरसाठी परवानगी देण्यास नकार दिला होता. जानेवारी 2024 मध्ये माहिती आणि प्रचार संचालनालयाने ‘आप’ला राजकीय जाहिरातींसाठी सार्वजनिक पैशाचा गैरवापर केल्याबद्दल व्याजासह 163.62 कोटी रुपये परत करण्यास सांगितले होते.









