वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली अध्यादेशाशी संबंधित विधेयक चालू आठवड्यात लोकसभेत मांडले जाईल, असे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. येत्या आठवड्यात संसदेत होणाऱ्या कामकाजाबाबत सभागृहाला माहिती देताना मेघवाल यांनी ही माहिती दिली. दरम्यान, यासंबंधीच्या विधेयकावरील चर्चेवेळी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नितीशकुमार यांच्या पक्षाने आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी करत उपस्थिती अनिवार्य केली आहे. तसेच आम आदमी पक्षासह ‘इंडिया’मधील सहकारी पक्षांनीही आपापल्या खासदारांना सतर्क केले आहे.
दिल्ली सरकारच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दुऊस्ती) विधेयकावरील चर्चेदरम्यान दिल्ली अध्यादेशाच्या कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या प्रस्तावांवरही चर्चा होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी, सौगता रॉय आणि ए राजा, एनके प्रेमचंद्रन आणि डीन कुरियाकोसे यांनी चर्चेसाठी नोटीस दिली आहे. दिल्ली अध्यादेशाद्वारे, केंद्र सरकारने दिल्लीतील ग्रुप ए अधिकाऱ्यांच्या लेफ्टनंट गव्हर्नरला बदली आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. याला दिल्ली सरकारकडून विरोध केला जात आहे.









