सेवेतून निलंबित, पोक्सो अंतर्गत कारवाई होणार, पत्नीचीही चौकशी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आपल्या मृत मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दिल्ली प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रेमोदय खाखा याला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा आदेश दिला. त्याच्या पत्नीचीही गुन्ह्याला साहाय्य केल्याप्रकरणी चौकशी केली जात आहे. अधिकाऱ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून अन्य अनुच्छेदही लावण्यात आले आहेत.
मात्र, अद्याप त्याला लवकर अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या अधिकाऱ्याला आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले. असे गंभीर गुन्हे करणाऱ्यांना अधिक काळ मोकळे राहू देता कामा नये, असे स्वाती मलिवाल यांनी स्पष्ट केले. आरोपींना मंगळवारी न्यायालयात आणण्यात येणार आहे.
आरोपी अधिकाऱ्याचे त्याच्या एका मित्राशी कौटुंबिक संबंध होते. या मित्राचा मृत्यू 2020 मध्ये झाला. त्यानंतर या अधिकाऱ्याने त्याच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या घरी आणले. ती त्याच्या घरी ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2021 असे चार महिने राहिली होती. या काळात त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याच्या पत्नीनेही या गुन्ह्यात त्याला साहाय्य केले होते. बलात्कारीत तरुणीला गर्भधारणा झाल्यानंतर तिचा गर्भ बेकायदेशीररित्या पाडण्यात आला होता. या कृत्यातही त्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा हात होता. त्यामुळे तिच्यावरही कारवाई करण्यात येत आहे.









