राजघाट-सर्वोच्च न्यायालयाच्या गेटपर्यंत पाणी : लष्करी जवान मदतकार्यात सहभागी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर प्रदेश-उत्तराखंडसह पर्वतीय भागात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता सखल भागात जास्त तीव्रतेने दिसून येत आहे. राजधानी दिल्लीसह नोएडामध्येही बऱ्याच ठिकाणी पुराचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. पावसामुळे गंगा आणि यमुना नदी आपले उग्र रूप दाखवत आहे. यमुनेने दिल्लीत कहर केला असून आयटीओ-राजघाट रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच पाणी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्याने दैनंदिन व्यवहारांवर विपरित परिणाम होताना दिसत आहे. सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. तसेच दिल्लीतील भयावह पूरस्थिती पाहता लष्कराच्या इंजिनिअरिंग विभागाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून मैदानी भागातील नद्यांच्या आसपासच्या जिह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या वाढत्या जलपातळीमुळे यमुना आणि गंगा काठावरील अनेक जिह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत विक्रमी वाढ झाल्याने दिल्लीकरांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या पाण्याची पातळी कमी होत असली तरी संकट कायम आहे. मुसळधार पावसानंतर दिल्लीत यमुना धोक्मयाच्या चिन्हावरून वाहत आहे. नदीचा प्रवाह कायम आहे. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक भागात परिस्थिती बिकट झाली आहे.
दिल्लीनंतर नोएडामध्येही यमुनेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद ठेवण्यात आली आहेत. नोएडातील सखल भागात बचावकार्य तीव्र करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहारनपूरमधील पुराची पाहणी करत मदत शिबिरांचा आढावा घेतला. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सहून गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर बोलून दिल्लीतील परिस्थिती जाणून घेतली. यासोबतच पंतप्रधान मोदींनी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्याशीही फोनवर चर्चा केली असून केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
1978 नंतर यमुनेच्या वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे दिल्लीतील लोकांसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. हथिनी कुंड बॅरेजमधून सोडण्यात आलेले पाणी दिल्लीकरांसाठी धोकादायक ठरले आहे. दुथडी भरून वाहत असलेल्या यमुनेमुळे तिच्या काठावर वसलेली अनेक गावे पाण्यात बुडाली असून दिल्लीचे रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. येत्या 24 तासात यमुनेच्या पाण्याची पातळी कमी होण्याची आशा गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेशातही पूरस्थिती
हथिनी कुंड बॅरेजमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे यमुनेच्या पाण्याच्या पातळीत विक्रमी वाढ झाली आहे. परिस्थिती बिकट बनली आहे. मथुरेत यमुना नदी आपले उग्र रूप दाखवत आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता यमुनेची जलपातळी 165.34 वर पोहोचली होती. मथुरेतील यमुनेचे धोक्मयाचे चिन्ह 166.0 मीटरवर आहे. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे मथुरेतील यमुना किनारी भागात पाणी शिरले असून, त्यामुळे आजूबाजूच्या सखल भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे.
बागपतमध्ये बांध फुटल्याने गावात पाणी
यमुनेचे पाणी वाढल्यामुळे बागपतमधील बंधारा फुटल्याने दोन गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले असून येथील परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. बिजनौरच्या अनेक गावातही पुराचे पाणी शिरले. पाण्याची पातळी वाढल्याने येथील परिस्थिती बिकट झाली आहे. प्रयागराजमध्ये गंगा, यमुना नद्यांच्या वाढत्या जलपातळीवर पूर नियंत्रण कक्षाकडून 24 तास सतत लक्ष ठेवले जात आहे. बोटीवाल्यांनाही भाविकांसह खोल पाण्यात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लाईफ जॅकेटशिवाय बोटी चालवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. प्रयागराजमधील घाटांवर जल पोलीस आणि पाणबुडे मदतनीस तैनात करण्यात आले आहेत.









