वृत्तसंस्था/ नारायणपूर, छत्तीसगड
येथे सुरू असलेल्या स्वामी विवेकानंद यू-20 पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये दिल्ली व मिझोराम संघांनी अंतिम फेरी गाठली. दिल्लीने भारतीय क्रीडा प्राधिकरणचा (साई) तर मिझोरामने आपलेच शेजारी मेघालयचा पराभव केला.
दिल्ली व मिझोराम या दोन्ही संघांनी उपांत्य लढतीच्या सामन्यात 4-0 याच गोलफरकाने विजय मिळविला. पहिल्या उपांत्य सामन्यात दिल्लीने वर्चस्व गाजवित साई संघावर मात केली. प्रारंभापासून दिल्लीने सामन्यावर नियंत्रण मिळविले. 15 व्या मिनिटाला अरमान अहमदने त्याच्या मार्करपेक्षा उंच उडी घेत हेडरवर जोरदार फटका मारत शानदार गोल केला. उत्तरार्धात 50 व्या मिनिटाला संखिल दारपोल तुइशांगने दुसरा गोल नोंदवला. प्रशान जाजोने 54 व्या मिनिटाला तिसरा व 65 व्या मिनिटाला आदित्य अधिकारीने संघाचा चौथा गोल करून अंतिम फेरीतील स्थानही निश्चित केले.
मिझोरामने मेघालयविरुद्ध आक्रमक खेळ केला. 28 व्या मिनिटाला मेसाक सी. लालरिंगहेताने बचावातील त्रुटीचा लाभ घेत पहिला गोल केला. 76 व्या मिनिटाला लालरिंगहेताला पेनल्टी क्षेत्रात पाडविल्याने मिझोरामला पेनल्टी मिळाली. त्यावर त्याने अचूक गोल नोंदवला. बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या एल. डान्टेसने 83 व्या मिनिटाला संघाचा तिसरा गोल केला. आणखी एक बदली खेळाडू एफ. वनलालछछुआहाने 92 व्या मिनिटाला चौथा गोल नोंदवून मोठा विजय साकार केला.









