आप उमेदवाराची बिनविरोध निवड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाच्या उमेदवार डॉ. शैली ओबेरॉय दुसऱयांदा दिल्लीच्या महापौर झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी भाजप उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ओबेरॉय यांची सर्वसंमतीने महापौरपदी निवड झाली आहे. तर आले मोहम्मद इक्बाल यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. या दोघांचेही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अभिनंदन केले आहे. जनतेला आम आदमी पक्षाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी कठोर मेहनत करा असे केजरीवालांनी ट्विट करत म्हटले आहे.
महापौर निवडणुकीकरता एकूण मतदारांची संख्या 274 इतकी होती. यातील 250 जण हे निवडून आलेले नगरसेवक, लोकसभेचे 7 खासदार आणि राज्यसभेचे 3 खासदार तसेच दिल्ली सरकारकडून नामनिर्देशित 14 आमदारांचा समावेश आहे. 274 पैकी 148 मते आम आदमी पक्षाकडे होती. तर दुसरीकडे भाजपकडे 115 इतके संख्याबळ होते. दिल्ली महापालिकेत 9 नगरसेवक काँग्रेसचे तर 3 नगरसेवक अपक्ष आहेत. संख्याबळ ‘आप’साठी अनुकूल असल्याने भाजपच्या महापौर अन् उपमहापौरपदाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला होता.
सर्वात मोठय़ा पक्षाच्या वतीने मी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु आमच्या पक्षाचे ध्येय इतरांप्रमाणे केवळ सत्ताप्राप्ती नाही. स्थायी समिती निवडणूक देखील होईल अशी आम्ही अपेक्षा करत होतो, परंतु हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीला पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात तारखांवर तारखा मागितल्या जात आहेत. याचमुळे स्थायी समितीची स्थापना करण्याची मागणी करत असल्याचे भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार शिखा राय यांनी म्हटले आहे.









