उपराज्यपालांचा निर्णय : भाजपचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिल्लीची सातवी विधानसभा विसर्जित केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर रविवारी आतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा विसर्जित झाल्यामुळे आता भाजपच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता भाजपनेही मुख्यमंत्री निवड करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर बैठका घेणे आणि चर्चांचे सत्र सुरू केले आहे.
राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली कायदा, 1991 च्या कलम 6 च्या उपकलम (2)(ब) द्वारे मला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून 8 फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीची सातवी विधानसभा विसर्जित करत असल्याचे उपराज्यपाल सक्सेना यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. 43 वर्षीय आतिशी मार्लेना सप्टेंबर 2024 पासून दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवताना ‘आप’ला सत्तेतून बाहेर काढत 27 वर्षांनी राष्ट्रीय राजधानीत पुन्हा सत्तास्थान प्राप्त केले. भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकून दोन तृतीयांश बहुमत मिळवले, तर ‘आप’च्या जागांची संख्या मागील 62 वरून 22 वर घसरली. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना पराभवानाचा सामना करावा लागला. नवी दिल्ली मतदारसंघात भाजपचे प्रवेश वर्मा विधानसभा निवडणुकीत हेवीवेट म्हणून उदयास आले.
आतिशी यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या पराभवानंतर रविवारी आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. रविवारी सकाळी 11 वाजता त्यांनी राज निवास येथे लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना यांच्याकडे राजीनामा सादर केला. आम आदमी पक्षाचे बहुतांश मोठे नेते निवडणुकीत पराभूत झाले आहेत. मात्र कालकाजी मतदारसंघातून आतिशी विजयी झाल्या आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांचे निवासस्थान सोडल्यानंतर राज निवास येथे जाऊन उपराज्यपालांना राजीनामा सादर केला. आतिशी यांच्या विजयामुळे आम आदमी पक्षाला थोडाफार दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.









