खराब हवेप्रकरणी भारत तिसऱ्या स्थानी : पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 या वर्षात भारत तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात खराब वायू गुणवत्ता असणारा देश ठरला आहे. स्वीस ऑर्गनायझेशन आयक्यू एअरच्या जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2023 नुसार बांगलादेश जगातील सर्वात प्रदूषित हवा असणारा देश आहे. 134 देशांच्या यादीत पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे.
नवी दिल्ली हे शहर सर्वाधिक वायू प्रदूषण असलेली राजधानी ठरले आहे. बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे. 2022 मध्ये प्रदूषित वायू असणाऱ्या देशांच्या यादीत भारत आठव्या स्थानावर होता.
भारतातील 96 टक्के लोक हे पीएम 2.5 ची पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडानुसार 7 पट अधिक आहे. देशाच्या 66 टक्के शहरांमध्ये वार्षिक पीएम 2.5 ची पातळी 35 मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटरपेक्षा अधिक राहिली आहे. अहवालात पीएम 2.5 कणांच्या आधारावर देश, राजधानी तसेच शहरांना स्थान देण्यात आले आहे. पीएम 2.5 ची पातळी अधिक असणे म्हणजे वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचणे आहे. भारतात मागील वर्षी पीएम 2.5 ची सरासरी पातळी 1 क्यूबिक मीटरमध्ये 54.5 मायक्रोग्रॅम राहिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडांनुसार 10 पट अधिक होते.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात दरवर्षी प्रदूषित हवेमुळे 70 लाख लोकांचा मृत्यू होत असतो. राजधानी दिल्लीत मागील वर्षी पीएम 2.5 ची पातळी 1 क्यूबिक मीटरमध्ये 92.7 मायक्रोग्रॅम राहिली आहे. तर बेगूसरायमध्ये हे प्रमाण 118.9 मायक्रोग्रॅम राहिले.









