स्वच्छता-सजावटीचे काम पूर्ण : सुरक्षेसाठी लष्कराची काउंटर ड्रोन यंत्रणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘जी-20’ समूहाची शिखर परिषद शनिवार-रविवारी दिल्लीत होत असून या सोहळ्यासाठी ‘राजधानी’ सज्ज झाली आहे. या परिषदेसाठी जगभरातून येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी दिल्लीला नववधूप्रमाणे सजवले जात आहे. सध्या स्वच्छता आणि सजावटीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तसेच सुरक्षा नियोजन आणि अंमलबजावणीही अंतिम टप्प्यात आले आहे. ‘भारत मंडपम’ हे परिषदस्थळ सुसज्ज बनविण्यात आले असून गुरुवारपासून विदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू होणार आहे
जी-20 साठी येणाऱ्या पाहुण्यांना विमानतळावरून मुख्य ठिकाण भारत मंडपम आणि राजघाट, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीकडे जावे लागते. या सर्व ठिकाणी पाहुण्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा सुंदर फुलझाडे व रोपांची लागवड करण्यात आली आहे. या सुसज्जतेमुळे हिरवाईसोबतच सौंदर्यही खुलून दिसू लागले आहे. स्वागतासाठी खास थायलंड आणि जपानमधून आयात केलेल्या फुलांचा वापर केला जाणार आहे. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी सुमारे चार हजार प्रकारची रोपे लावण्यात आली आहेत.
‘जी-20’ चा संपूर्ण कार्यक्रम तीन दिवस चालणार असून, इतर कार्यक्रमांसाठी परदेशी पाहुण्यांचा मेळा आठवडाभर दिल्लीत राहणार असल्यामुळे दीर्घकाळ मार्गांवरील सजावटीसाठी विशेष फुलांच्या सजावटीच्या वनस्पतींचा वापर केला जात आहे. मुख्य परिषदस्थळाबरोबरच राजघाट हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची समाधीस्थळही सर्वांगसुंदर बनविण्यात आले आहे.
बहुस्तरीय सुरक्षा
दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी 18 व्या ‘जी-20’ शिखर परिषदेदरम्यान परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी रंगीत तालीम पूर्ण केली आहे. दिल्लीत सर्व ठिकाणी ‘मल्टीलेअर सिक्मयुरिटी सिस्टिम’ तैनात केली आहे. जी-20 परिषदेसाठी तयार करण्यात आलेला सुरक्षेचा ताफा हुबेहूब ‘बाहुबली’ या हिंदी चित्रपटाच्या ‘महिष्मती’सारखा आहे. पाचस्तरीय सुरक्षा घेरामध्ये प्रत्येक 100 मीटरवर कमांडो तैनात केले जातील. विमानतळापासून हॉटेल, प्रगती मैदान, राजघाट आणि परदेशी पाहुणे भेट देऊ शकतील अशा इतर ठिकाणांपर्यंत वर्तुळाकार संरक्षण यंत्रणा तयार करण्यात आली आहे. परदेशी पाहुण्यांचा ताफा निघणाऱ्या मार्गांवर दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान तैनात असतील. विमानतळावरूनच परदेशी पाहुण्यांना पाचस्तरीय सुरक्षा पुरवली जाणार आहे. विमानतळापासून हॉटेलपर्यंत खास ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. परदेशी पाहुण्यांना दिल्लीतील 23 हॉटेल्स आणि एनसीआरमधील 9 हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.









