गुप्तचर यंत्रणांकडून अतिदक्षतेचा इशारा जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली-एनसीआरसह देशातील विविध राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका दर्शविला आहे. राष्ट्रीय राजधानीतील सुरक्षेबाबत गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट जारी केल्यानंतर पोलिसांसह अन्य सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. गर्दीची ठिकाणे, इस्रायली दुतावास, परदेशी लोकांची रहदारी-वास्तव्य असलेली ठिकाणे आणि इतर धार्मिक स्थळांना दहशतवादी संघटना लक्ष्य करू शकतात, असे गुप्तचर विभागाने म्हटले आहे. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत सतर्कता जारी करण्यात आली आहे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन सुरक्षा यंत्रणांनी सर्वसामान्यांना केले आहे.
बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणांसोबतच सुपर मार्केट्स, धार्मिक केंद्रे, प्रमुख ऊग्णालये, रेल्वेस्थानके, बसस्थानके, मॉल्स आणि पर्यटनस्थळे यासारख्या विविध ठिकाणी यादृच्छिक तपासण्या करण्याच्या सूचना पोलिसांना करण्यात आल्या आहेत. गणवेशात नसलेले अधिकारी हिटलिस्टवरील ठिकाणांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सध्या सणासुदीचा काळ सुरू असलेल्या दिल्लीतील एन्ट्री पॉईंटवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
ऐन सणासुदीत घातपाताचा कट
दिल्लीत मोठा घातपात घडवण्याचा कट रचण्याचा विचार दहशतवादी करत आहेत. देशात सणासुदीचे वातावरण सुरू असतानाच दिल्लीतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी दिल्ली पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. सणांच्या दिवशी दहशतवादी हल्ले होऊ शकतात. दहशतवाद्यांनी आपला उद्देश सफल करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित माहिती दिल्ली पोलिसांशी शेअर केली आहे. दहशतवादी संघटना हल्ल्याचा कोणताही मोठा कट करू शकतात, असे सांगण्यात आले आहे. शहरातील गर्दीची कोणतीही जागा आणि काही देशांचे दुतावासही दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जाऊ शकतात.









