संपूर्ण एनसीआरमध्ये ‘ग्राप’-4 लागू : ‘वर्क फ्रॉम होम’ला अनुमती
ट्रकसह व्यावसायिक वाहनांवर बंदी, प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील हवेने विषारी रूप धारण केले आहे. प्रदुषणकारी वातावरणामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. दरम्यान, दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण पाहता ‘ग्राप’चा चौथा टप्पा लागू करण्यात आला आहे. रविवारी, कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटने (सीएक्यूएम) संपूर्ण एनसीआर विभागात ‘ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन’ (जीआरएपी अर्थात ‘ग्राप’) चा चौथा टप्पा तत्काळ लागू करण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत आता नवीन निर्बंध लागू झाले आहेत. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. आता दिल्ली आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये बीएस-6 व्यतिरिक्त डिझेल वाहने चालवण्यास बंदी लागू करण्यात आली आहे.
दिल्ली-एनसीआरमधील एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) ‘गंभीर’ श्रेणीमध्ये असल्याने सरकारने सार्वजनिक प्रकल्पांशी संबंधित बांधकाम आणि प्रदूषणकारी ट्रक आणि चारचाकी व्यावसायिक वाहनांना राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. हे नियम केंद्राच्या वायू प्रदूषण नियंत्रण योजनेच्या अंतिम चौथ्या टप्प्यांतर्गत लागू केले गेले आहेत. यासंबंधीचा आदेश रविवारी जारी करण्यात आला. तसेच या धोकादायक प्रदूषणापासून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी दिल्ली सरकारने सर्व प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
सरकारने जारी केलेल्या नव्या निर्देशांनुसार, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या भागात प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्ली आणि एनसीआरमध्ये 50 टक्के सरकारी आणि खासगी कार्यालये बंद करण्यासह सर्व आपत्कालीन उपायांची अंमलबजावणी करण्यास सांगितले. त्यानुसार कर्मचाऱ्यांना घरून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या सूचनांचाही समावेश आहे. प्रदूषण निर्माण करणाऱ्या वाहनांना दिल्लीत प्रवेश निषिद्ध करण्यात आले असले तरी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये सहभागी नसलेल्या सर्व मध्यम आणि अवजड वाहनांना राजधानीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण संस्थेने गुऊवारी अत्यावश्यक नसलेली बांधकामे आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांच्या विशिष्ट श्रेणींवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते.
दिल्लीतील प्रतिकूल हवामान आणि शेजारील राज्यांमध्ये पेंढा जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना रविवारी दुपारी 3 वाजता एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) 463 नोंदवला गेला. हे प्रमाण शनिवारी दुपारी 4 वाजता 415 इतके होते. वायू प्रदुषणाची ही गंभीर समस्या केवळ दिल्लीपुरती मर्यादित नाही, तर शेजारील हरियाणा, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या राज्यांतील अनेक शहरांमध्ये हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे.
प्राथमिक शाळा बंद राहणार…
दिल्ली सरकारने प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांनी माध्यमिक विद्यार्थ्यांसाठीही ऑनलाईन वर्गांचा विचार केला जात असल्याचे सांगितले. यापूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.
‘ग्राप’-4 नुसार…
► दिल्लीबाहेरून येणाऱ्या सर्व ट्रकच्या प्रवेशावर बंदी. तथापि, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक ट्रकना या बंदीतून सूट.
► दिल्लीत नोंदणीकृत मध्यम आणि जड वजनाच्या डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट मिळेल.
► दिल्ली आणि एनसीआरमध्ये डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांवर बंदी. तथापि, आपत्कालीन वाहनांना सूट. फक्त बीएस-6 वाहने धावणार.
► एनसीआरमधील उद्योगांवर बंदी. तथापि, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि वैद्यकीय उपकरणांशी संबंधित उद्योगांना सूट देण्यात आली आहे.
► बांधकाम आणि पाडकामांवर बंदी. याशिवाय उड्डाणपूल, महामार्ग, पूल, पाईपलाईन यासह अन्य कामांवर बंदी लागू झाली आहे.
► एनसीआर राज्य सरकार सार्वजनिक, कॉर्पोरेशन आणि खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के क्षमतेसह घरून काम करण्याची परवानगी देऊ शकतात.
► राज्य सरकार प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये बंद करण्याबरोबरच आपत्कालीन नसलेले व्यावसायिक उपक्रम बंद करू शकतात.









