‘लँड फॉर जॉब’ प्रकरणातील याचिका फेटाळली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना शनिवार, 31 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणी सुरू असलेली कनिष्ठ न्यायालयाची कार्यवाही थांबवण्याची त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या घोटाळ्याची चौकशी सध्या सीबीआयकडून सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच अन्य एका घोटाळा प्रकरणातही लालूंसह कुटुंबीयांना मोठा दणका बसला होता.
लालूप्रसाद यादव यांनी याचिकेत कनिष्ठ न्यायालयात आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली होती. तथापि, न्यायालयाने ही याचिका न स्वीकारता कार्यवाही सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता आरोपांवर युक्तिवाद करण्यासाठी 2 जून रोजी विशेष न्यायाधीशांसमोर सुनावणी होणार आहे.
‘लँड फॉर जॉब’चा खटला लालू यादव रेल्वेमंत्री असतानाचा आहे. त्या काळात जमिनीच्या बदल्यात अनेक उमेदवारांना नोकरी देण्यात आली होती. या प्रकरणात लालू यादव, त्यांची पत्नी राबडीदेवी आणि मुलगी मीसा भारती यांच्यासह अनेक जण आरोपी आहेत. सीबीआय या घोटाळ्याची चौकशी करत आहे. या प्रकरणात खटल्याच्या न्यायालयीन कामकाज थांबवण्यासाठी कोणतेही ठोस कारण न्यायमूर्ती रविंदर दुडेजा यांना आढळले नाही. लालू यादव यांचे वकील कपिल सिब्बल यांनी शनिवारच्या सुनावणीवेळी न्यायालयात हजेरी लावली होती.









