वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवारी येथे झालेल्या दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये केनियाचा धावपटू डॅनियल इबेनोने तसेच इथोपियाची महिला धावपटू अलमाझ आयनाने अनुक्रमे पुरुष आणि महिला विभागातील अजिंक्यपदे मिळविली.
दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या विभागात 28 वर्षीय डॅनियल इबेनोने 59 मिनिटे 27 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक तर केनियाचा चाल्स मॅटेटाने 1 मिनिट 00.05 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक तर इथोपियाच्या अधीसू गोबेनाने 1 मिनिट, 00.51 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले. 2023 च्या बुडापेस्टमध्ये झालेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत इबेनोने पुरुषांच्या 10 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक मिळविले होते.
महिलांच्या विभागात इथोपियाच्या आयनाने 1 तास, 7 मिनिटे आणि 59 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक, युगांडाच्या स्टिला चेसँगने 1 मिनिट, 08.28 सेकंदासह रौप्यपदक तर केनियाच्या व्हिओला चेपनेगिनोने 1 मिनिट, 09.09 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक पटकाविले. दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये भारताच्या पुरुष आणि महिलांच्या इलाईट विभागात अनुक्रमे अभिषेक पाल आणि कविता यादव हे सर्वात जलद धावपटू ठरले. अभिषेक पालने 1 मिनिट, 04.08 सेकंदाचा अवधी घेतला तर महिलांच्या विभागात कविता यादवने 1 मिनिट, 17.42 सेकंदाचा अवधी घेत नोंदविला. सहा वर्षांपूर्वी 31 वर्षीय आयनाने दिल्ली हाफ मॅरेथॉन स्पर्धा जिंकली होती. दिल्ली हाफ मॅरेथॉनच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये विविध गटात सुमारे 36 हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता.









