वृत्तसंस्था/ अमृतसर
78 व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत दिल्लीने अंतिम फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेत ब गटातून दिल्लीने आपले प्राथमिक फेरीतील तिन्ही सामने जिंकून आघाडीचे स्थान पटकाविले. शनिवारी येथे झालेल्या ब गटातील शेवटच्या सामन्यात दिल्लीने हरियाणाचा 2-0 असा पराभव केला.
दिल्ली आणि हरियाणा यांच्यातील या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. मात्र उत्तरार्धात दिल्लीतर्फे 2 गोल नोंदविले गेले. 50 व्या मिनिटाला जयदिप सिंगने तर 61 व्या मिनिटाला के.एस. शिखरने हे गोल केले. हरियाणातर्फे शेवटपर्यंत खाते उघडले गेले नाही. ब गटात आता दिल्लीने 3 सामन्यातून 9 गुणासह पहिले स्थान घेत या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली. ब गटातील अन्य एका सामन्यात उत्तराखंडने चंदीगडचा 4-0 असा फडशा पाडला. ब गटात उत्तराखंड 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
संतोष करंडक स्पर्धेतील अंतिम फेरी हैदराबादमध्ये 14 डिसेंबरपासून खेळवली जाईल. अ गटातून विद्यमान विजेता सेनादल, बंगाल, मणिपूर, यजमान तेलंगणा, जम्मू काश्मिर, राजस्थान तर ब गटातून गेल्या वर्षीचा उपविजेता गोवा, दिल्ली, केरळ, तामिळनाडू, ओडिशा आणि मेघालय यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.









