दुपारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक आमंत्रित : 19 किंवा 20 फेब्रुवारी रोजी शपथविधी अपेक्षित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे, परंतु मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. आता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरील सस्पेन्स संपणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक सोमवार, 17 फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र, रविवारी रात्री उशिराने सोमवारी होणारी बैठक लांबणीवर पडल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होणार होते. आता विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी भाजप निरीक्षकांची नावे जाहीर झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. सुधारित माहितीनुसार, ही बैठक येत्या बुधवारी म्हणजे 19 फेब्रुवारीला होणार असून 20 फेब्रुवारीला शपथविधी सोहळा आयोजित केला जाणार आहे.
सोमवारी दुपारी 3 वाजता भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. दिल्लीतील सर्व भाजप आमदार आणि दिल्लीतील सर्व सात भाजप खासदार या बैठकीला उपस्थित राहतील असे सांगण्यात आले होते. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरील सस्पेंस संपुष्टात येणार होता. आता ही बैठक बुधवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केल्यानंतरच भाजप नेते उपराज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करू शकते. 19 किंवा 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीत शपथविधी सोहळा होऊ शकतो अशी चर्चा आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकून दिल्लीतील आम आदमी पक्षाची सत्ता संपुष्टात आणली आहे. तर ‘आप’ला केवळ 22 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसच्या पारड्यात एकही जागा न पडल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
निवडणुकीपूर्वी भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न केल्यामुळे आता कोणाच्या गळ्यात माळ पडते हे अजूनही गुलदस्त्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 48 पैकी 15 आमदारांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत आणि त्यापैकी 9 आमदारांची नावे शॉर्टलिस्ट केली जातील. त्यानंतर त्या 9 जणांमधून मुख्यमंत्री, मंत्री आणि सभापतींची नावे निश्चित केली जातील. सध्या मुख्यमंत्रिपदासाठी ज्या नावांची चर्चा सुरू आहे त्यात रेखा गुप्ता, शिखा राय, प्रवेश वर्मा, मोहन सिंग बिष्ट, विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, आशिष सूद आणि पवन शर्मा यांची नावे आहेत.
प्रवेश वर्मा देखील शर्यतीत
यावेळी दिल्लीच्या लढाईत सर्वात महत्त्वाचा चेहरा असलेला प्रवेश वर्मा देखील शर्यतीत आहेत. त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांचा पराभव केला आहे. तसेच अन्य एक नाव मोहनसिंग बिष्ट यांचे आहे. ते सहावेळा आमदार आहेत. मूळचे उत्तराखंडचे असलेले बिष्ट हे विद्यार्थीदशेतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. दिल्ली भाजपचा मोठा चेहरा मानले जाणारे विजेंद्र गुप्ता हे देखील शर्यतीत आहेत. ते सलग तीनवेळा आमदार आहेत. ते दिल्ली भाजपचे अध्यक्षही राहिले आहेत. ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य देखील आहेत.
सतीश उपाध्यायही दावेदार
सतीश उपाध्याय हेदेखील दावेदारांमध्ये आहेत. ब्राह्मण चेहरा असल्याने त्यांचे नावही आघाडीवर आहे. यापूर्वी ते दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. याशिवाय दुसरे नाव आशिष सूद यांचे असून ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. सध्या ते गोवा भाजपचे प्रभारी आहेत आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपचे सह-प्रभारी आहेत. नवनिर्वाचित आमदार पवन शर्मा यांचेही नाव पुढे येत आहे. यावेळी ते उत्तम नगरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत.









