वृत्तसंस्था/ बेंगळूर
महिला प्रीमियर लीगमध्ये आज शनिवारी येथे होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स व यूपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने येतील तेव्हा दिल्ली कॅपिटल्स अव्वल स्थानावर पोहोचण्याचे लक्ष्य ठेवेल, तर यूपी वॉरियर्स आपला पहिला विजय नोंदवण्यासाठी उत्सुक असतील.
सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या मागे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या दिल्लीने त्यांचे तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. याउलट यूपी वॉरियर्स सलग दोन पराभवांमुळे तळाशी आहे. या आठवड्याच्या सुऊवातीला दोन्ही संघ वडोदरा येथे भिडले होते, जिथे दिल्लीने सात गडी राखून विजय मिळवला होता. जेतेपदाचा दावेदार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या दिल्लीचा उत्साह कर्णधार मेग लॅनिंगच्या फॉर्ममध्ये परतण्याने तसेच मॅरिझान कॅप आणि अॅनाबेल सदरलँडसह मधल्या फळीतील महत्त्वपूर्ण योगदानामुळे वाढलेला असेल.
मात्र सलामीवीर शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज अधिक सातत्य राखण्यास उत्सुक असतील. गोलंदाजीच्या आघाडीवर अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडेने माऱ्याचे चांगले नेतृत्व केले आहे. परंतु तिला तिच्या सहकारी गोलंदाजांकडून चांगल्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. यूपी वॉरियर्सना दिल्लीविरुद्धच्या मागील सामन्यात तीन सोडलेले झेल आणि क्षेत्ररक्षणातील गलथानपणा महागात पडला होता. यावेळी ते अधिक धारदार प्रदर्शन करण्याचा निर्धार करतील. वॉरियर्सना त्यांच्या फलंदाजीकडून, विशेषत: दीप्ती, तऊण यष्टिरक्षक-फलंदाज उमा छेत्री आणि सलामीवीर वृंदा दिनेश यांच्याकडूनही अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.









