वृत्तसंस्थ/ बेंगळूर
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याला दुपारी 3.30 वाजता चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रारंभ होणार आहे. वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत वावरत आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाची आयपीएल स्पर्धेच्या मोहिमेला चांगली सुरुवात झालेली नाही. आतापर्यंत दिल्लीचे चार सामने झाले असून ते गमविले आहेत. त्यामुळे त्यांना स्पर्धेच्या गुणतक्त्यात आपले खाते उघडता आले नाही. कर्णधार वॉर्नर तसेच अष्टपैलू अक्षर पटेल यांना आक्रमक फलंदाजी करावी लागेल. वॉर्नरने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळविले असले तरी त्याचा स्ट्राईक रेट 114.83 असा संथ असल्याने त्याला शनिवारच्या सामन्यात धावांची गती वाढवावी लागेल. गेल्या चार सामन्यांमध्ये पृथ्वी शॉ, सर्फराज खान, रॉसो यांना फलंदाजीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. सलामीच्या पृथ्वी शॉला प्रतिस्पर्धी संघाच्या दर्जेदार वेगवान गोलंदाजीसमोर तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्फराज खानच्या जागी मनिष पांडेला संघात स्थान दिल्यानंतरही तो फलंदाजीत चमकू शकला नाही. आयपीएलमध्ये पदार्पण करणारा नवोदीत यश धूल मुंबई विरुद्धच्या सामन्यात केवळ 4 चेंडूना सामोरे जात बाद झाला. शनिवारच्या सामन्यासाठी रिपल पटेलला तसेच पॉवेलच्या जागी फिल सॉल्टला खेळविले जाईल असा अंदाज आहे. दिल्लीच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने नॉर्त्जे, मुस्ताफिजूर रेहमान, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यावर राहिल. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्याकडून अद्याप मॅच विनिंग कामगिरी झालेली नाही.
डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत समाधानकारक कामगिरी करत आहे. त्यांनी या स्पर्धेत विजयी सलामी दिल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यातील सलग पराभवामुळे त्यांचा संघ पुन्हा पिछाडीवर राहिला आहे. कोहली आणि डु प्लेसिस यांची फलंदाजी बहरत आहे. त्याचप्रमाणे आक्रमक फलंदाज मॅक्सवेलकडून जलद धावांची अपेक्षा आहे. शनिवारच्या सामन्यात बेंगळूरचा संघ पुन्हा विजय मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न करेल. बेंगळूर संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज नवा चेंडू व्यवस्थितपणे हाताळत आहे. दरम्यान, शेवटच्या षटकामध्ये बेंगळूरच्या गोलंदाजावर दडपण येत असल्याचे जाणवते. हर्षल पटेलवर तसेच हसरंगावर ही जबाबदारी पुन्हा टाकण्यात येईल. बेंगळूर संघाने आतापर्यंत या स्पर्धेत तीन सामने खेळले असून एक सामना जिंकला आहे. तर दोन सामने गमविले आहेत. गुणतक्त्यात बेंगळूरचा संघ 2 गुणासह सातव्या स्थानावर आहे.
दिल्ली कॅपिटल्स : वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, सर्फराज खान, अमन हकिम खान, अभिषेक पोरल, अक्षर पटेल, खलील अहमद, कुलदीप यादव, रोहमन पॉवेल, रॉसो, नॉर्त्जे, मुस्ताफिजूर रेहमान, साकारिया, मुकेशकुमार, सॉल्ट, एन्गिडी, दुबे, ललित यादव, रिपल पटेल, व्हिकी ओसवाल, इशांत शर्मा, मनिष पांडे, कमलेश नागरकोटी आणि धूल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, दिनेश कार्तिक, शहाबाज अहमद, अनुज रावत, आकाश दिप, महिपाल लोमरोर, अॅलेन, सुयश प्रभूदेसाई, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, पार्नेल, एच. शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव आणि मिचेल ब्रेसवेल.
सामन्याची वेळ : दु. 3.30 वा.