लॅनिंगचे अर्धशतक, जोनासेनची अष्टपैलू कामगिरी, यूपी वॉरियर्सच्या मॅकग्राची खेळी वाया
वृत्तसंस्था/ मुंबई
कर्णधार मेग लॅनिंगने झळकावलेले सलग दुसरे अर्धशतक आणि जेस जोनासेनने केलेली अष्टपैलू कामगिरी यांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सवर 42 धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजीस उतरावे लागल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 4 बाद 211 धावांपर्यंत मजल मारली. त्यात लॅनिंगने 42 चेंडूंत 70 धावांची खेळी केली. 20 चेंडूंत नाबाद 42 धावा काढणाऱ्या जेस जोनासेनने नंतर 3 बळी घेतल्याने यूपी वॉरियर्सला 20 षटकांत 5 बाद 169 वर रोखणे त्यांना शक्य झाले.

‘यूपी वॉरियर्स’च्या ताहलिया मॅकग्राने 50 चेंडूत नाबाद 90 धावा काढल्या, पण ही खेळी फुकट गेली. महिला प्रीमियर लीगमधील ही आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. दिल्लीचा हा दुसरा विजय होता, तर यूपी वॉरियर्सला या निकालामुळे पहिला पराभव पत्करावा लागला. चौथ्या षटकात जोनासेनने दिलेल्या दुहेरी तडाख्यातून यूपी वॉरियर्सला सावरता आले नाही. तिने विरोधी कर्णधार अॅलिसा हिली (24) आणि किरण नवगिरे (2) यांचा अडथळा दूर केला.
भारताची 19 वर्षांखालील संघातील खेळाडू श्वेता सेहरावत (1) हिला सहा चेंडूंचा सामना करावा लागला आणि यादरम्यान तिला बरेच धडपडावे लागले. मॅरिझान कॅपच्या गोलंदाजीवर झेल देऊन ती परतल्याने यूपी वॉरियर्सची परिस्थिती 3 बाद 31 अशी झाली. या सामन्यासाठी मध्यमगती गोलंदाज शबनिम इस्माईलला पसंती देऊन गुजरात जायंट्सविऊद्धचा सामना जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचललेल्या ग्रेस हॅरिसला बाहेर ठेवण्याचा यूपी वॉरियर्सचा निर्णय प्रश्न निर्माण करून गेला. इस्माईलने प्रभावी गोलंदाजी केली असली, तरी लक्ष्याचा पाठलाग करताना फटकेबाज हॅरिसची अनुपस्थिती त्यांना जाणवली.
तत्पूर्वी, लॅनिंगने दिल्लीच्या डावात केलेली जोरदार खेळी (42 चेंडूत 70) आणि सहकारी ऑस्ट्रेलियन खेळाडू जोनासेनने (20 चेंडूत नाबाद 42) शेवटच्या षटकांत केलेली फटकेबाजी यामुळे दिल्लीला दुसऱ्यांदा 200 धावांचा टप्पा पार करता आला. दिल्लीने शेवटच्या पाच षटकांत 65 धावा कुटल्या आणि जोनासेनला जेमिमा रॉड्रिग्सची (22 चेंडूंत नाबाद 34 धावा) चांगली साथ मिळाली. खेळपट्टी लवकर वेगवान गोलंदाजांना अनुकूल होईल असे समजून यूपी वॉरियर्सने क्षेत्ररक्षण निवडले, परंतु दिल्लीने सुरुवातीपासून मोठे लक्ष्य समोर ठेवण्याच्या दिशेने वाटचाल केली.
लॅनिंग आणि तिची सलामीची जोडीदार शेफाली वर्मा (14 चेंडूंत 17 धावा) यांनी 39 चेंडूंत 67 धावांची भागीदारी करत यूपी वॉरियर्सचा निर्णय चुकीचा ठरविला. लॅनिंगच्या खेळीत 10 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश राहिला. इस्माईल वगळता यूपी वॉरियर्सच्या इतर सर्व गोलंदाजांनी प्रति षटक 10 पेक्षा जास्त धावा दिल्या.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स 4 बाद 211 (लॅनिंग 70, जोनासेन नाबाद 42, जेमिमा रॉड्रिग्स नाबाद 34, अॅलिस कॅप्सी 21. इस्माईल 1-29, राजेश्वरी गायकवाड 1-31, मॅकग्रा 1-37, एक्लेस्टोन 1-41) यूपी वॉरियर्स 5 बाद 169 (अॅलिसा हिली 24, ताहलिया मॅकग्रा 90, देविका वैद्य 23. मॅरिझान कॅप 1-29, शिखा पांडे 1-18, जोनासेन 3-43)









