वृत्तसंस्था/ बेंगळूर
सामनावीर शेफाली वर्मा आणि जेस जोनासेन यांच्या वैयक्तिक नाबाद अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी येथे महिलांच्या प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेतील सामन्यात आरसीबीचा 27 चेंडू बाकी ठेऊन 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे दिल्ली संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 7 सामन्यातून 10 गुणासह आघडीचे स्थान भक्कम केले आहे. या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजी दिली. आरसीबीने 20 षटकात 5 बाद 147 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्लीने 15.3 षटकात 1 बाद 151 धावा जमवित विजय नोंदविला.
आरसीबीच्या डावामध्ये इलेसी पेरीने 47 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 60, राघवी बिस्तने 32 चेंडूत 2 षटकारांसह 33, डॅनी वेट हॉजने 18 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21, कर्णधार मानधनाने 1 चौकारासह 8, वेरहॅमने 1 चौकारासह नाबाद 12 धावा केल्या. दिल्ली संघातर्फे शिखा पांडे आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 तर कॅपने 1 गडी बाद केला. आरसीबीच्या डावात 6 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली कॅपिटल्सची सलामीची फलंदाज कर्णधार लेनिंग तिसऱ्या षटकात केवळ 2 धावांवर झेलबाद झाली. त्यानंतर मात्र आरसीबीच्या गोलंदाजांना शेवटपर्यंत दिल्लीचा गडी बाद करता आला नाही. शेफाली वर्मा आणि जोनासेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 146 धावांची शतकी भागिदारी केली.
शेफाली वर्माने 43 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 80 तर जोनासेनने 38 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 61 धावा झोडपल्या. दिल्लीने पहिल्या 6 षटकात 41 धावांत 1 गडी गमाविला. जोनासेनने 30 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह तर शेफाली वर्माने 30 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने शतकी भागिदारी 54 चेंडूत नोंदविली. दिल्लीच्या डावात 5 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले.









