वृत्तसंस्था/ वडोदरा
विरोधाभासी विजयांसह सुऊवात केलेले रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आज सोमवारी येथे महिला प्रीमियर लीगमध्ये एकमेकांसमोर येतील तेव्हा आपले स्थान मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्सने पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सचा सहा गडी राखून पराभव केला, तर कॅपिटल्सना मुंबई इंडियन्सवर विजय मिळविण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत वाट पाहावी लागली.
परंतु एकूणच संतुलन, विशेषत: फलंदाजी आणि गोलंदाजी विभागाचा विचार करता आरसीबीचे पारडे दिल्लीच्या तुलनेत थोडेसे जड राहते. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील संघाने 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य फारशा अडचणीविना गाठलेले असून त्यातून त्यांची फलंदाजीतील ताकद पूर्ण दिसून आली आहे. राघवी बिश्त, कनिका आहुजा यासारख्या तऊण खेळाडूंच्या समावेशाने त्यांना बळकटी मिळाली आहे. या खेळाडू मानधना, एलिस पेरी, रिचा घोष आणि डॅनी व्हायट यासारख्या वरिष्ठ खेळाडूंसोबत सहज मिसळून गेल्या आहेत. कनिका आणि बिश्त या दोघांनीही गुजरात जायंट्सवरील संघाच्या विजयात उत्कृष्ट भूमिका बजावल्या.
तथापि त्यांना त्यांच्या गोलंदाजांकडून अधिक नीटनेटक्या प्रयत्नांची अपेक्षा असू शकते. पेरी गोलंदाजीपासून दूर राहिल्याने या विभागात त्यांचा प्रभाव थोडा कमी झाला आहे. ही ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडू अलीकडच्या महिला अॅशेसदरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरत आहे आणि किमान महिला प्रीमियर लीगच्या सुऊवातीच्या टप्प्यात ती गोलंदाजी करणार नाही.
त्यामुळे अनुभवी किम गार्थ आणि जॉर्जिया वेअरहॅम यांच्याकडून अधिक प्रभावी योगदानाची आवश्यकता असेल. कारण दोघांनीही गुजरातविऊद्ध भरपूर धावा दिल्या. युवा व्ही. जे. जोशिता आणि प्रेमा रावत याही पुढे सरसावून अनुभवी रेणुका सिंगला आधार देतील, अशी आशा आरसीबी बाळगून असेल. कारण दिल्लीकडे कर्णधार मेग लॅनिंग, अॅनाबेल सदरलँड, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अॅलिस कॅप्सी आणि सारा ब्राइस यांचा समावेश असलेला एक आक्रमक फलंदाजी विभाग आहे.
मुंबईविऊद्धच्या सामन्यात दिल्लीच्या या फलंदाजीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, परंतु आरसीबीच्या तुलनेने अधिक अननुभवी गोलंदाजांविरुद्ध ही कसर भरून काढण्याचा या खेळाडू प्रयत्न करतील. आरसीबीला अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडेच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या गोलंदाजांचे आव्हानही पेलावे लागेल. कारण त्यांनी मागील सामन्यात मुंबईला 164 धावांवर रोखून दाखविलेले आहे.









