युपी वॉरियर्सचा 5 गड्यांनी पराभव, अॅलिसी कॅप्से सामनावीर
वृत्तसंस्था/ मुंबई
महिलांच्या पहिल्या प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेत मंगळवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात ‘सामनावीर’ अॅलिसी कॅप्सेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने युपी वॉरियर्सचा 5 गड्यांनी पराभव करत थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेत अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरस निर्माण झाली होती पण दिल्लीने मुंबई इंडियन्सला मागे टाकत थेट अंतिम फेरी गाठली.
मंगळवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना युपी वॉरियर्सने 20 षटकात 6 बाद 138 धावा जमवल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 17.5 षटकात 5 बाद 142 धावा जमवत आपला विजय नेंदवला.
युपी वॉरियर्सच्या डावात ताहिला मॅकग्राने शानदार फलंदाजी करताना 32 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारासह नाबाद 58, कर्णधार अॅलिसा हिलीने 34 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 36, श्वेता शेरावतने 12 चेंडूत 4 चौकारासह 19, सिमरन शेखने 23 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा जमवल्या. दीप्ती शर्मा 3, किरण नवगिरेने 2, सरवानीने नाबाद 3 धावा जमवल्या. इक्लेस्टोनला आपले खाते उघडता आले नाही. हिली अणि शेरावत यांनी सलामीच्या गड्यासाठी 25 चेंडूत 30 धावा जमवल्या. युपीच्या डावात 3 षटकार आणि 17 चौकार नोंदवले गेले. दिल्लीतर्फे अॅलिसी कॅप्से सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 26 धावात 3, राधा यादवने 28 धावात 2, जोनासेनने 24 धावात एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली कॅपिटल्सच्या डावात कर्णधार लेनिंग आणि शेफाली वर्मा यानी सलामीच्या गड्यासाठी 29 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. युपी वॉरियर्सच्या यशश्रीने शेफाली वर्माला झेलबाद केले. तिने 16 चेंडूत 4 चौकारासह 21 धावा जमवल्या. त्यानंतर इस्माईलने रॉड्रीग्जला 3 धावावर पायचित केले कर्णधार लेनिंग तिसऱ्या गड्याच्या रुपात बाद झाली. इस्माईलने तिला शेखकडे झेल देण्यास भाग पाडले. लेनिंगने 23 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 39 धावा जमवल्या. 7 षटकात दिल्लीने 3 बाद 70 धावा जमवल्या होत्या. अॅलिसी कॅप्से आणि कॅप यांनी चौथ्या गड्यासाठी 60 धावांची भागीदारी केली. इक्लेस्टोनने कॅप्सेला हिलीकरवी यष्टीचित केले. तिने 31 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 34 धावा जमवल्या. जोनासेन एकेरी धाव घेण्याच्या नादात आपले खाते उघडण्यापूर्वीच धावचित झाली. कॅप आणि रे•ाr यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. दिल्लीने हा सामना 13 चेंडू बाकी ठेवून पाच गड्यांनी जिंकला. कॅपने 31 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 34 धावा जमवल्या. दिल्लीच्या डावात 4 षटकार आणि 17 चौकार नोंदवले गेले. युपीतर्फे शबनीम इस्माईलने 29 धावात 2 तर इक्लेस्टोन व यशश्री यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : युपी वॉरियर्स 20 षटकात 6 बाद 138 (हिली 36, शेरावत 19, शेख 11, मॅकग्रा नाबाद 58, शर्मा 3, सरवानी नाबाद 3, कॅप्से 3-26, राधा यादव 2-28, जोनासेन 1-24), दिल्ली कॅपिटल्स 17.5 षटकात 5 बाद 142 (लेनिंग 39, शेफाली वर्मा 21, रॉड्रीग्ज 3, कॅप नाबाद 34, अॅलिसी कॅप्से 34, अवांतर 11, शबनीम इस्माईल 2-29, यशश्री 1-26, इक्लेस्टोन 1-25).









