सामनावीर मिचेल स्टार्कचे 5 बळी : डु प्लेसिसचे शानदार अर्धशतक : हैदराबादचा सलग दुसरा पराभव
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
पहिला सामना शेवटच्या षटकात जिंकणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसरा सामना जिंकला आहे. विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीने सनरायजर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. दिल्लीच्या विजयाचा स्टार ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क होता, ज्याने 5 विकेट्स घेतल्या आणि सनरायझर्सच्या स्फोटक फलंदाजीचा नाश केला. प्रथम फलंदाजीला आलेला हैदराबादचा संघ 18.4 षटकांत 163 धावात ऑलआऊट झाला. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य दिल्लीने 16 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यातच पूर्ण केले. ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
सनरायजर्स हैदराबादने दिलेल्या 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात दमदार झाली. जेक फ्रेझर मॅकगर्क आणि फाफ डू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. डू प्लेसिसने 27 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 50 धावांची तुफानी खेळी साकारली. याशिवाय जेक फ्रेझर मॅकगर्कने 32 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटाकारांसह 38 धावांचे योगदान दिले. यानंतर आलेल्या केएल राहुल 5 चेंडूत 15 धावा करत बाद झाला. राहुलच्या विकेटनंतर ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल 16 व्या षटकातच विजय मिळवून देत नाबाद माघारी परतले. स्टब्सने 14 चेंडूत 3 चौकारांसह 21 धावा केल्या. तर अभिषेक पोरेल 18 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार लगावत 34 धावा करत नाबाद परतला.
स्टार्कचा पंजा, कुलदीपचे 3 बळी
प्रारंभी, सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हैदराबादचा हा निर्णय त्यांच्यावरच उलटला. हैदराबादची विस्फोटक सलामी खेळी या सामन्यात फेल ठरली. अभिषेक शर्मा (1) पहिल्याच षटकात विचित्र पद्धतीने झेलबाद झाला. तर पॉवरप्लेमध्येच स्टार्कने दोन षटकात हैदराबादला 3 झटके दिले. स्टार्कने ट्रॅव्हिस हेड (22), इशान किशन (2) आणि नितीश रे•ाrच्या (0) विकेट घेत हैदराबादला धक्का दिला. यानंतर अनिकेत वर्माने एकट्याने हैदराबादला 150 च्या वर पोहोचवले.
अनिकेत वर्माने तुफानी फलंदाजी करताना 41 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांसह 74 धावांची शानदार खेळी केली. तर क्लासेन 32 धावा करत बाद झाला. याशिवाय कोणताच फलंदाज 10 धावांचा आकडाही गाठू शकला नाही. तळाच्या फलंदाजांनीही निराशा केल्याने हैदराबादचा संघ 18.4 षटकांत 163 धावांत ऑलआऊट झाला. दिल्लीकडून स्टार्कने 3.4 षटकांत 35 धावा देत 5 विकेट्स घेतले. तर कुलदीपने 4 षटकांत 22 धावा देत 3 विकेट्स घेतले.
संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद 18.4 षटकांत सर्वबाद 163 (ट्रेव्हिस हेड 22, अनिकेत वर्मा 41 चेंडूत 74, हेन्रिक क्लासेन 32, मिचेल स्टार्क 35 धावांत 5 बळी, कुलदीप यादव 3 बळी)
दिल्ली कॅपिटल्स 16 षटकांत 3 बाद 166 (मॅकगर्क 38, डु प्लेसिस 50, अभिषेक पोरेल नाबाद 34, केएल राहुल 15, स्टब्ज नाबाद 21, झीशान अन्सारी 3 बळी).









