आयपीएल : विजयासह दिल्लीचा शेवट गोड : सामनावीर समीर रिझवीची नाबाद अर्धशतकी खेळी : मुस्तफिजूर रेहमानचे 3 बळी
वृत्तसंस्था/जयपूर
येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 8 बाद 206 धावा केल्या. यानंतर दिल्लीने विजयी लक्ष्य 19.3 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. या पराभवामुळे प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या पीबीकेएसला टॉप-2 मध्ये स्थान मिळवणे कठीण झाले आहे. दिल्लीने लीग टप्प्यात 15 गुणांसह पाचव्या स्थानावर राहून अंतिम फेरी गाठली, पण संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.
पंजाबने विजयासाठी दिलेल्या 207 धावांचा पाठलाग करताना दिल्लीला केएल राहुल आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने शानदार सुरुवात करताना अर्धशतकी सलामी दिली. दोघांनी मिळून 55 धावा जोडल्या. केएल राहुलने 6 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्याने 35 धावांची खेळी केली. तर फाफ डू प्लेसिसने 23 धावांची खेळी केली. ही जोडी बाद झाल्यानंतर करुण नायरने एक बाजू धरून ठेवली होती. मात्र, तो 44 धावांवर हरप्रीत ब्रारच्या चेंडूवर त्रिफळाचित होऊन माघारी परतला. सेट फलंदाज करूण नायर बाद झाल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवीने महत्वपूर्ण धावा करत संघाला विजय मिळवून दिला. रिझवीने 25 चेंडूत नाबाद 58 धावा केल्या तर स्टब्जने 18 धावांचे योगदान दिले. प्रारंभी, दिल्लीने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पंजाबच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर प्रियांश आर्या 6 धावा काढून बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्स 20 षटकांत 8 बाद 206 (प्रभसिमरन सिंग 28, जोस इंग्लिश 32, श्रेयस अय्यर 53, मार्क स्टोनिस नाबाद 44, मुस्तफिजूर रेहमान 3 बळी, विपराज निगम व कुलदीप यादव प्रत्येकी 2 बळी) दिल्ली कॅपिटल्स 19.3 षटकांत 4 बाद 208 (केएल राहुल 35, डु प्लेसिस 23, करुण नायर 44, समीर रिजवी नाबाद 58, ट्रिस्टन स्टब्ज नाबाद 18, हरप्रीत ब्रार 2 बळी, यान्सेन व प्रविण दुबे प्रत्येकी 1 बळी).









