प्रतिनिधी/ पणजी
आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठा अशी ओळख असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) प्रतिनिधी नोंदणी कालपासून सुरू झाली आहे. त्याशिवाय इफ्फीमध्ये विविध ओटीटी माध्यमांचेही व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी नोंदणी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
या महोत्सवासाठी गोवा हे कायमस्वरुपी केंद्र बनविण्यात आले असून दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचा महोत्सव येत्या दि. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
या महोत्सवात चित्रपटांशी संबंधित भारतासह जगभरातील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, सिनेमाटोग्राफर यांच्यासह ज्युरी मंडळ आणि अन्य नामांकित अतिथी तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.









