वायुसेनाप्रमुखांची टीका, तथापि, स्वदेशीचे समर्थन
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
संरक्षण उत्पादनांचा एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झालेला नाही, अशी कठोर टीका भारताचे वायुदल प्रमुख अमर प्रीत सिंग यांनी केली आहे. सीआयआयच्या वार्षिक परिषदेत ते भाषण करीत होते. संरक्षण सामग्रीचा वेळेवर पुरवठा सैन्यदलांना होणे अत्यंत महत्वाचे आहे. विलंब चिंताजनक आहे, असे विधान त्यांनी केले आहे. एकदा विशिष्ट कालावधी निर्धारित केल्यानंतर, त्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे. तथापि, अशाप्रकारे आजवर एकाही प्रकल्पाची पूर्तता समयबद्ध पद्धतीने झाल्याचे आपल्याला स्मरत नाही. ही स्थिती सुधारण्यासाठी गंभीरपणे विचार होण्याची आवश्यकता आहे. जर आश्वासने पाळता येत नसतील, तर ती द्यावीच कशासाठी? अशीही संतप्त पृच्छा अमर प्रीत सिंग यांनी केली आहे.
तेजसच्या उत्पादनांना विलंब
भारतीय बनावटीच्या तेजस एम के 3 ए या हलक्या युद्धविमानाच्या सुधारित आवृत्तीच्या उत्पादनाला विलंब लागत आहे. भारतीय वायुदलाने अशा 83 विमानांची मागणी नोंदविली असून हिंदुस्थान एरॉनॉटिक्स या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीशी या संबंधात 48 हजार कोटी रुपयांचा करारही झाला आहे. मार्च 2024 पासून या विमानांच्या पुरवठ्याला प्रारंभ केला जाणार होता. तथापि, एक वर्ष होऊन गेले तरी विमानांचा पुरवठा झालेला नाही. या विमानाचे इंजिन अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक या कंपनीकडून आयात केले जाणार आहे. मात्र, या आयातीला विलंब झाल्याने हा प्रकल्प रखडला आहे, हे उदाहरण सिंग यांनी दिले.
स्वदेशीचे केले समर्थन
संरक्षण उत्पादनांच्या उत्पादनांमध्ये भारताने स्वयंपूर्णता मिळविली पाहिजे, या धोरणाचे त्यांनी समर्थन केले. आणखी 10 वर्षांमध्ये भारतीय वायुदलाला आणखी अत्याधुनिक विमानांची आवश्यकता भासणार आहे. पाचव्या पिढीतील मध्यम विमानांच्या स्वदेशी उत्पादनाच्या प्रकल्पाला संमती देण्यात आली असून त्यासाठी 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे, ही प्रशंशनीय बाब आहे. मात्र, वायुदलाच्या सध्याच्या आवश्यकतांकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यासाठी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला मोठा वेग देण्याची आवश्यकता आहे. तसे केल्यास सज्ज स्थितीतील उत्पादनांची आवश्यकता भागणार आहे. भारतात संरक्षण साधनांचे डिझाईन स्वदेशी पद्धतीने निर्माण करण्याची प्रक्रिया यासमवेतच होत राहू शकते, असेही विधान वायुदलप्रमुख सिंग यांनी त्यांच्या भाषणात केले.
नवे तंत्रज्ञान अत्यावश्यक
आज युद्धव्यवस्थेत नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला निर्णायक महत्व प्राप्त झाले आहे. नवे अत्याधुनिक तंत्रज्ञान वेळीच सेनादलांमध्ये समाविष्ट होण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलते. त्यामुळे ते उशिराने हाती आले तर त्याचा उपयोग नसतो. त्यामुळे जेव्हा ते शोधले जाते, त्यानंतर त्वरित त्याचा समावेश सेनादलांमध्ये करण्याची व्यवस्था केली जावी, अशीही सूचना त्यांनी केली.
सिंदूर अभियानाने काय दिले?
भारताने पाकिस्तानविरोधात चालविलेल्या सिंदूर अभियानाची त्यांनी प्रशंसा केली. या अभियानाने आम्ही सध्या कोणत्या स्थितीत आहोत आणि भविष्यात आम्हाला कशाची आवश्यकता लागणार आहे, याची पूर्व कल्पना दिली आहे. या अभियानात सुरक्षा प्राधिकारणे आणि सैन्यदले यांच्यात अत्यंत चोख आणि व्यायसायिक पद्धतीचा संपर्क आणि समन्वय होता. त्यामुळे हे अभियान यशस्वी झाल्याची भलावणही वायुदलप्रमुख सिंग यांनी आपल्या भाषणात केली.









