बेतोड्यातील माळरानांवर लागवडीची लगबग : मान्सून चांगला बरसल्यास मळे बहरतील
दाभाळ : पाऊस यंदा वेळेत सुरु होईल याचा अंदाज बांधून बेतोडा, कोडार, निरंकाल भागातील शेतकऱ्यांनी काकडीचे मळे व अन्य गावठी भाजीच्या लागवडीला सुरुवात केली होती. मात्र मान्सूनच्या पावसाने मृग नक्षत्राला हुलकावणी दिल्याने रुजत टाकलेल्या बियाण्यांना हवे तसे पाणी न मिळाल्याने रोपांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे गावठी भाजी जरा उशिराच बाजारात दाखल होणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग रानमाळ व डोंगर टेकड्यांवर पावसाळी हंगामात गावठी काकड्या, दोडकी, कारली, चिबुड व अन्य हंगामी पिकाची लागवड करतात. येथील शेतकरी कुटुंबियांचा उदरनिर्वाहासाठी चाललेला हा जोड धंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून लांबणारा उन्हाळा, पाण्याची टंचाई व विलंबित पावसामुळे शेतकऱ्यांना हवे तसे पिक घेता येत नाही. याशिवाय किटक आणि रानटी जनावरांच्या उपद्रवामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कृषी खात्याने या समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची मागणी दरवर्षी येथील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
काकडी व दोडकी हे मळे वाल्यांचे पावसाळी हंगामातील प्रमुख पिक असून त्याची सुरुवात काकडी उत्पादनाने होते. पावसाळ्यात ही गावठी काकडी बाजारात उपलब्ध होत असली तरी त्याची सुरुवात एप्रिल – मे महिन्यापासूनच करावी लागते. उन्हाळ्यात या भागात पाणी टंचाईचे सावट असते. त्यामुळे मिळेल तेथून पाण्याच्या घागरी किंवा बॅरल्समध्ये पाणी साठवून रोपे शिंपावी लागतात. दरवर्षी भर उन्हात येथील शेतकरी ही कष्टाची कामे करताना दिसतात. ऐरवी वर्षभर फार्महाऊस किंवा परराज्यातील काकड्या बाजारात उपलब्ध होत असतात. गोवेकरांना मात्र येथील स्थानिक काकड्या म्हणजेच तोवशांची प्रतिक्षा असते. सुरुवातीला या गावठी काकड्या जरा महाग असल्या तरी जास्त पैसे मोजूनही त्यांची चव आवर्जुन चाखली जाते. जूनमध्ये सुरु होणारा मळ्यांचा हंगाम ऑगस्टपर्यंत चालतो. काही वेळा गणेश चतुर्थीपर्यंत या गावठी भाज्या उपलब्ध होतात. श्रावण महिन्यातील गोवेकरांच्या शाकाहारी जेवणाची गरज या गावठी भाज्यांनेच भागत असते. सध्या बेतोडा, निरंकाल, कोडार व आसपासच्या भागात जी शेतकरी कुटुंबे मळे लावतात त्यामध्ये बहुतेक वयस्क शेतकरीच अधिक दिसतात. युवावर्ग अभावानेच आढळते. या पारंपरिक कृषी व्यवसायात नवीन पिढीला फारसा रस नाही. त्यामुळे अंगात ताकद असे पर्यंत ही कृषी परंपरा सुरु ठेवणार असल्याचे गुरुदास गावडे, दामू गावडे, मंगेश गावडे, उत्तम गावडे, राजेंद्र गावडे, शोभावती गावकर, तुळशीदास गावडे, सुधाकर गावकर, श्रीकांत गावडे, कुसूम गावडे, रोहिदास गावडे, खुशाली गावडे, रमाकांत गावकर, शांताराम गावडे, दत्ता गावडे आदी वयस्क शेतकऱ्यांनी सांगितले. बऱ्याचवेळा कष्ट करूनही पूर्वीप्रमाणे चांगले उत्पादन मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
कृषी खात्याने आधार दिल्यास मळे अधिक बहरतील : सरपंच उमेश गावडे
कृषी खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सर्व सामान्य शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारने कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकरी जगला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था टिकून राहील. त्यासाठी कृषी खात्याने पारंपरिक मळ्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक ते साहाय्य करण्याची गरज आहे, असे बेतोडा निरंकालचे सरपंच व प्रगतशील शेतकरी उमेश गावडे यांनी सांगितले. पंचायत क्षेत्रातील बहुतेक कुटुंबे पावसाळ्यात गावठी काकडी व अन्य हंगामी पिके घ्यायची. त्यावरच त्यांची उपजीविकाही चालायची. हल्ली पाण्याची तीव्र टंचाई, रानटी जनावरांचा वाढता उपद्रव व अन्य कारणांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी या व्यावसाय करणे बंद केले आहे. अवघे मोजकेच शेतकरी शिल्लक आहेत. शेतकऱ्यांना व खास करून युवावर्गाला या व्यवसायाकडे वळविण्यासाठी कृषी खात्याने विशेष योजना आखली पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर वेळोवेळी उपाययोजना करतानाच लागवडीसाठी लागणारे कृषी साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावे लागेल. शिवाय पाणी साठवण्यासाठी जलकुंभ, रानटी जनावरांचा उपद्रव रोखण्यासाठी सौर उर्जेवरील कुंपण व कृषी यंत्रे उपलब्ध करून दिल्यास त्यांचे बरेचसे श्रम कमी होतील. काही वर्षांपूर्वी सरकारने ‘कृषी अधिकारी तुमच्या दारी’ ही संकल्पना राबविली होती. शेतकऱ्यांसाठी ती उपयुक्त ठरली होती. ती पुन्हा सुरु करण्याची मागणी सरपंच गावडे यांनी केली आहे.
रोजगार हमी योजना शेतीसाठी लागू करावी : गुऊदास गावडे
माळ रानावर व डोंगर टेकड्यांवर हंगामी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागतात. जमिनीची मशागत, साफसफाई, मळ्याला कुंपण घालणे, मांडव उभारणे अशी बरीच कामे असतात. त्यासाठी मनुष्यबळ जास्त लागते. कामगारही सहज उपलब्ध होत नाही. शिवाय सध्या मुजरांचे भरमसाठ पैसे देणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यासाठी सरकार व पंचायतीने रोजगार हमी योजनेमध्ये शेती कामाचा समावेश करावा. ज्यामुळे शेतीत काम करताना त्यांना रोजगार मिळणे व शेतकऱ्यांनाही आधार होईल, असे वयस्क शेतकरी गुरुदास गावडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी मळ्यामध्ये भरपूर कष्ट करून उत्पादन घेतले तरी बऱ्याचवेळा त्यांच्या पिकांना अपेक्षित बाजार दर मिळत नाहीत. त्यामुळे नफ्यापेक्षा नुकसानच सोसावे लागते. कृषी खाते व फलोत्पादन महामंडळातर्फे हंगामी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच खतांचे दर भरमसाठ वाढल्याने सवलतीच्या दरात खत पुरवावे, असे पंचसदस्य दिनेश गावकर यांनी सांगितले.









