सांगली / रावसाहेब हजारे :
यावर्षीची वैद्यकीय प्रवेशासाठीच्या पहिल्या फेरीची प्रक्रिया नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दीड ते दोन महिना उशिरा सुरू झाली. त्यामध्येही पहिल्या फेरीचे वेळापत्रक सात वेळा बदलले. आयुष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचा अद्याप पत्ता नाही. तर फी संदर्भातही महाविद्यालयांना स्पष्ट सूचना नाहीत. एकूणच रखडलेल्या या प्रवेश प्रक्रियेमुळे हजारो विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.
डॉक्टर होण्याचे स्वप्न उरी बाळगून आयुष्यातील काही वर्षे जीवतोड अभ्यास केल्यानंतरचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया. परंतु गेल्या दोन वर्षापासून ही प्रक्रिया उशिरा होऊ लागल्याने परीक्षेनंतरचे सहा महिने विद्यार्थी आणि पालकांना तणावाखाली काढावे लागत आहेत.
केंद्रीय कोट्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या पहिल्या फेरीचे वेळापत्रक मेडिकल कौन्सिलिंग कमिटीने आतापर्यंत सातवेळा बदलले. आयुष अभ्यासक्रमा साठीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही. त्यामुळे ही वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया किती दिवस चालणार याची कसलीच माहिती पालक अथवा विद्यार्थ्यांना नाही. केंद्रीय व राज्य कोटयाच्या वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीचा निकाल नुकताच जाहीर झाला.
१४ जून रोजी नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाल्याने ही प्रक्रिया आणखी किती दिवस चालणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सातत्याने पुढे जाणाऱ्या या प्रक्रियेमुळे विद्यार्थी आणि पालकांचा ताण वाढू लागला आहे.
- सरसकट खुल्या गटातील फी आकारणी सुरू
राज्याच्या कोट्याच्या जागांसाठीचा निकाल १३ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. विद्यार्थ्यांना १४ ते २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. पण १५ रोजी स्वातंत्र्यदिनाची आणि त्यानंतर सलग दोन सुट्टया आल्या. याशिवाय महाविद्यालयांचे फी स्ट्रक्चर अद्याप निश्चित झालेले नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे उत्पन्न मर्यादा कमी केली की वाढवली याबाबत स्पष्ट निर्देश नसल्याने वैद्यकीय महाविद्यालयांनी खुल्या गटानुसार सरसकट फी भरून घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम आहे.
- स्वायत्तचा कटऑफ वाढला, शासकीयचा घसरला
महाराष्ट्रातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयातून ८१३८, तर दंत महाविद्यालयाच्या २७१८ जागांचे प्रवेश होणार आहेत. यासाठी ६४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध वैद्यकीय अभ्यासासाठी अर्ज केला आहे. परंतु यावर्षी स्वायत्त महाविद्यालयांचा कट ऑफ वाढला असून शासकीय महाविद्यालयांचा कटऑफ घसरल्याचे चित्र आहे.
- पहिल्या फेरीचे प्रवेश २२ ऑगस्टपर्यंत
केंद्रीय कोटयाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या पहिल्या फेरीचे वेळापत्रक मेडिकल कौन्सिलिंग कमिटीने सातवेळा अचानक पुढे ढकलले. १३ ऑगस्टला पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला. महाविद्यायात प्रवेशासाठीची मुदत २२ ऑगस्टपर्यंत आहे. त्यानंतर दुसरी फेरी कधी सुरू होणार या विचाराने पालक आणि विद्यार्थ्यांचाही तणाव वाढला आहे. कर्नाटकने दुसऱ्या फेरीमध्ये भाग घेण्यासाठी १२ लाखांचे डिपॉझिट जमा करण्याची सुचना केली आहे. कौन्सिलरकडून पालकांना बारा लाखांची तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. प्रवेश निश्चितीनंतर ते शुल्क महाविद्यालयाच्या फी मधून कमी करण्यात येणार आहे. परंतु प्रवेश मिळणार की नाही याची शाश्वती नसतानाही पालकांना बारा लाखांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
- प्रवेश नियामक प्राधिकरणने लक्ष घालावे
नीटच्या निकालानंतर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. प्रवेशाच्या अजून तीन चार फेऱ्या बाकी आहेत. आयुष्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भात अद्याप सूचना नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक त्रस्त आहेत. त्यामुळे या प्रवेश नियामक प्राधिकरणने यामध्ये लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत ऋषिकेश जगधने यांनी तरूण भारतशी बोलताना व्यक्त केले. जगधने म्हणाले, नीट परीक्षेचा निकाला १४ जून रोजी लागल्यानंतर पंधरा दिवसांत ऑल इंडिया कोटा प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. परंतु ही ३१ जुलै रोजी झाली. तर ३१ जुलै रोजी लागणारा निकाल १३ ऑगस्ट रोजी लागला. मागील वर्षी नीट परीक्षेच्या गोंधळामुळे व नवीन कॉलेजना उशीरा मान्यता मिळाल्याने आयुषची प्रवेश प्रक्रिया जानेवारी महिन्यापर्यंत चालू होती. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर होत असल्याने संबंधित प्रवेश नियामक प्राधीकरणने यामध्ये योग्य ते लक्ष घालण्याची गरज आहे.








