महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्थिती
बेळगाव : सर्व्हरडाऊन समस्येमुळे महापालिकेत देण्यात येणाऱ्या जन्म-मृत्यू दाखल्यांसह व्यापार परवाना देण्याचे काम सोमवार दि. 20 रोजी सकाळपासून ठप्प होते. त्यामुळे दाखले मिळविण्यासाठी महापालिकेत आलेल्या नागरिकांना दिवसभर ताटकळत थांबण्याची वेळ आली. महापालिकेतील आरोग्य विभागाकडून जन्म आणि मृत्यू दाखले ऑनलाईन पद्धतीने वितरित केले जातात. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने संबंधितांना तातडीने दाखले दिले जातात. रविवारी सुटी असल्याने सोमवारी महापालिकेत जन्म-मृत्यू दाखले घेण्यासाठी, नूतन व्यापार परवाना आणि जुन्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे व त्यांचे सहकारीदेखील नवीन व्यापार परवाने व परवान्यांचे नूतनीकरण करून देण्यासाठी सकाळपासूनच कार्यालयात उपलब्ध होते. मात्र, सर्व्हरडाऊनमुळे दाखले उपलब्ध झाले नाहीत.









